'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 02:20 IST2025-11-29T02:18:38+5:302025-11-29T02:20:24+5:30
"जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि मंदीशी झुंजत असताना, पंतप्रधान मोदींचे निर्णायक नेतृत्व, सुधारणांची गती आणि धोरणात्मक स्थैर्यामुळे भारत पुढे जात आहे."

'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
भारतीय अर्थव्यवस्थेने ८.२ टक्क्यांच्या GDP ग्रोथ रेटसह पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपने शुक्रवारी या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'निर्णायक नेतृत्वाला' दिले. तसेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधत, "देशाची अर्थव्यवस्था 'बर्बाद झाली' म्हणणारे आता कुठे आहेत?" असा सवाल केला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विद्यमान आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) दुसऱ्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) ८.२ टक्के राहिली. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालवधीत ते ५.६ टक्के एवढे होते. खरे तर ही वाढ अंदाजित वाढीपेक्षा फार अधिक आहे. या वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत ही वाढ ७.८ टक्के होती.
"...भारत पुढे जात आहे" -
या घडामोडींवर भाष्य करताना भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, "जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि मंदीशी झुंजत असताना, पंतप्रधान मोदींचे निर्णायक नेतृत्व, सुधारणांची गती आणि धोरणात्मक स्थैर्यामुळे भारत पुढे जात आहे." मालवीय पुढे म्हणाले, जीएसटी तर्कसंगत करणे, विवेकपूर्ण वित्तीय शिस्त आणि संतुलित मौद्रिक समन्वय यांसारख्या परिवर्तनीय उपायांमुळे गुंतवणूक आणि उपभोगाचा एक चांगला काळ सुरू झाला. यामुळे भारत जागतिक विकासाच्या केंद्रस्थानी संपूर्ण शक्तीने उभा राहिला. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, भारत वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ८.२ टक्क्यांच्या प्रभावी वाढीसह जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिला आहे.
📈 India remains the world’s fastest-growing major economy in Q2 FY26, posting an impressive 8.2% growth (July–Sept 2025).
— Amit Malviya (@amitmalviya) November 28, 2025
While the global economy struggles with uncertainty and a sharp slowdown, India continues to surge ahead, powered by Prime Minister Narendra Modi’s decisive…
'डेड इकॉनॉमी' म्हणणारे कुठे?
दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी जीडीपीच्या आकडेवारीचे कौतुक करताना राहुल गांधींवर टीका केली. "अर्थव्यवस्था बर्बाद झाली आहे, असे म्हणणारे लोक आता कुठे आहेत? त्यांचे राजकीय करियर संपले आहे," असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचे समर्थन करत, पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशिवाय सगळ्यांना माहिती आहे की, भारत एक 'डेड इकॉनॉमी' (बर्बाद अर्थव्यवस्था) आहे, असा दावा केला होता.