स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:13 IST2025-11-19T15:06:44+5:302025-11-19T15:13:52+5:30
Sleeper Vande Bharat Bullet Train: स्लीपर वंदे भारत आणि बुलेट ट्रेन कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येऊ शकतात, याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली.

स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Sleeper Vande Bharat Bullet Train: गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनची ट्रायल देशभरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आणि त्याच्या ट्रायल रनही पूर्ण करण्यात आल्या. परंतु, अद्याप ती ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आलेली नाही. यातच दुसऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन सुरू झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांच्याकडे अलीकडेच घेतला. या दोन्ही ट्रेन सेवा प्रवाशांच्या सेवेत कधी येणार याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्णपणे पूर्ण होईल. ऑगस्ट २०२७ मध्ये सुरत ते वापी दरम्यानच्या १०० किलोमीटरच्या मार्गावर पहिला टप्पा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. बुलेट ट्रेन मूळतः पहिल्या टप्प्यात सुरत ते बिलीमोरा दरम्यान ५० किलोमीटर धावणार होती, जी आता सुरत आणि वापीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ताशी ३२० किलोमीटर वेगाने प्रवास करणारी ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किलोमीटरचे अंतर १.५८ तासात पूर्ण करेल.
स्लीपर वंदे भारत ट्रेन कधीपासून सुरू होणार?
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होईल, याबाबत बोलताना रेल्वे मंत्री वैष्णव यांनी उत्तर दिले की, स्लीपर वंदे भारत ट्रेन पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये सुरू होईल. ज्या शहरांमध्ये पहिली सेवा सुरू होईल, त्यांचा सध्या विचार केला जात आहे. चाचण्या सुरू आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले. वंदे भारत स्लीपरच्या पहिल्या आवृत्तीत काही बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना प्रवासात कमी झटके लागतील, याची खात्री करून पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी बनवण्यात आल्या आहेत. स्प्रिंग्ज आणि इतर घटकांमध्येही बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना जागतिक दर्जाचा आरामदायी प्रवास अनुभव देणे हे उद्दिष्ट आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनला अलीकडेच भेट दिली. पंतप्रधान बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या गतीबाबत खूप समाधानी आहेत. या प्रकल्पातून आपण जे काही शिकत आहोत ते केवळ रेल्वेमध्येच नव्हे तर इतर विविध क्षेत्रांमध्येही वापरले पाहिजे. भविष्यात, देशातील अधिक शहरांमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आहे.