भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 21:23 IST2025-05-06T21:23:34+5:302025-05-06T21:23:55+5:30
Pakistan News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे.

भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधा उडालेली आहे. भारतीय सैन्यदलं पहलगामचा बदला घेण्यासाठी कधीही हल्ला करतील, अशी भीती पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्कराला वाटत आहे. पाकिस्तानमधील नेते, मुत्सद्दी आणि पत्रकार हल्ल्याबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. दरम्यान, दिल्लीमध्ये पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेले माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात येणाऱ्या हल्ल्याबाबत नवी तारीख जाहीर केली आहे.
भारत पाकिस्तानवर १० किंवा ११ मे रोजी हल्ला करू शकतो असा दावा अब्दुल बासित यांनी ट्विट करत केला आहे. भारत १० आणि ११ मेरोजी पाकिस्तानविरोधात मर्यादित लष्करी कारवाई करू शकतो. तत्पूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसाक डार आणि संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत ३६ ते ४८ तासांमध्ये हल्ला करू शकतो, असा दावा केला होता.
दरम्यान, अब्दुल बासित यांनी केलेला दावा हा पाकिस्तानकडून चालवण्यात येणाऱ्या प्रोपेगेंडा वॉरचा भाग असू शकतो, कारण भारत पाकिस्तानविरुद्ध कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे, त्याची तारीख काय असेल आणि ही कारवाई कुठे होईल, याबाबत काही मोजक्या लोकांशिवाय फार कुणाला माहिती असण्याची शक्यता नाही आहे.
गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे तपासामधून समोर आले होते. तेव्हापासूनच पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.