'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 21:25 IST2025-08-09T21:23:27+5:302025-08-09T21:25:00+5:30
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या धराली गावात भयंकर दुर्घटना घडली. ५ ऑगस्ट रोजी धराली गावावर मोठं संकट कोसळलं.

'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
ते तिथे थांबले असते, तर मृत्यूने त्यांच्यावरही झडप घातली असती; पण म्हणतात ना की काळ आला होता पण वेळ नाही... तसंच काहीसं त्यांच्यासोबत घडलं. ते धरालीतून निघाले. त्यावेळी तिथे सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. बाजार होता, तिथे अनेक लोक होते. पण, परत आले तेव्हा त्या जागेचं स्मशान झालं होतं. जिकडे बघावं, तिकडे फक्त चिखल. तेही या आपत्तीमुळे धरातील अडकले होते. धरालीमध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल २२ पर्यटकांनी थरारक अनुभव सांगितला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केरळातील काही भाविक गंगोत्री दर्शनासाठी उत्तराखंडमध्ये होते. धरालीतून त्यांना मातलीमध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांनी माध्यमांशी बोलताना कधीही विसरता येणाऱ्या घटनेबद्दल सांगितलं.
नाश्ता केला, चहा घेतला आणि निघालो
रामचंद्र नाय म्हणाले, '५ ऑगस्ट रोजी आम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता करण्यासाठी धरालीमध्ये थांबलो. नंतर बाहेर पडलो. तेव्हा सगळं सुरळीत सुरू होतं. पाऊसही नव्हता. तिथून आम्ही निघालो आणि गंगोत्रीला पोहोचलो. दुपारी २ वाजता तिथून परत निघालो. गंगोत्रीवरून दहा किमी खाली आलो.'
'पोलिसांनी तिथेच आमच्या गाड्या थांबवल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की, पुढे भूस्खलन झाले आहे. मोठंमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. मग म्हणाले तुम्हाला इथेच थांबावं लागेल. मग आम्ही गाडी बाजूला उभी केली आणि तिथे थांबलो. आमच्याप्रमाणे तिथे खूप लोक होते. नंतर आम्हाला कळलं की धराली गावच मलब्याखाली दबले गेले आहे', असे नायर यांनी सांगितले.
परत आलो तेव्हा स्मशान झाले होते
'आम्ही धरालीमध्ये नाश्ता केला. चहा घेतला. सगळीकडे वर्दळ होती. लोक बाजारात फिरत होती. पण, जेव्हा आम्ही गंगोत्रीवरून परत धराली गावाजवळ आलो, तेव्हा सगळं भयावह दृश्य होतं. सगळीकडे स्मशानासारखी परिस्थिती झाली होती. ती जागा ओळखणंही अवघड झालं होतं. ती जागा खूपच भयंकर दिसत होती', असे ते म्हणाले.