"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:48 IST2025-11-19T14:46:00+5:302025-11-19T14:48:28+5:30
Umar Nabi Delhi Blast News : दिल्लीतील लालकिल्ला परिसरात आत्मघाती स्फोट करणाऱ्या उमर नबीचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. उमर नबी बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी त्याच्या भावाला मोबाईल दिला होता.

"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
आय२० कार चालवणाऱ्या डॉ. उमर नबीने स्वतःलाही उडवून घेत स्फोट घडवला. राजधानी दिल्लीतीललाल किल्ला परिसरात झालेल्या या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या उमर नबीचा एक व्हिडीओही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आला. त्यानंतर त्याच्या मोबाईलचा शोध सुरू झाला. पोलिसांनी केलेल्या तपास उमर नबी हल्ल्याच्या आधी काश्मीरमध्ये गेला होता. तिथेच त्याने स्वतःच्या मोबाईलची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली होती. उमर नबीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टमध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. पीटीआयने पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, उमर नबीचा भाऊ जहूर इलाही याला वरिष्ठ पोलीस अधीक्षक जी.व्ही. सुंदीप चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पथकाने ताब्यात घेतले होते. श्रीनगरमधून ताब्यात घेतल्यानंतर जहूरची चौकशी करण्यात आली. उमरचा कट काय होता, याबद्दल विचारण्यात आले; पण त्याने आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
जहूर इलाहीकडेच उमर नबीने दिला होता मोबाईल
ताब्यात घेतलेल्या जहूर इलाही याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने तोंड उघडले. जहूर इलाही म्हणाला, "उमर नबीने मला त्याचा मोबाईल दिला होता. त्याने मला दम देत सांगितले होते की, जर माझ्याबद्दल काही बातम्या आल्या, तर माझा मोबाईल पाण्यामध्ये नष्ट कर."
उमर नबीने सांगितल्या प्रमाणे इलाहीने दिल्ली स्फोटानंतर मोबाईल फेकून दिला होता. पोलिसांनी इलाही सोबत घेतले आणि ज्या ठिकाणी मोबाईल पुरला होता, तिथे पोहोचले. पोलिसांना मोबाईल मिळाला असून, तो तुटलेल्या अवस्थेत आहे. उमरचा मोबाईल आता फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या मोबाईलमधून पोलीस माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तपास करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्याने सांगितले की, उमर आयएसआय आणि अल कायदाच्या अत्यंत चिथावणीखोर व्हिडीओमुळे या मार्गाला गेला. आतापर्यंत जे पुरावे मिळाले आहेत, त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, उमरला अत्यंत विध्वंसक स्फोट घडवून आणायचा होता.