आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:02 IST2025-12-08T18:02:14+5:302025-12-08T18:02:42+5:30
आजपासून नागपूर येथे सुरू झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
आजपासून नागपूर येथे सुरू झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विरोधी पक्षनेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तर या चर्चांदरम्यान, विरोधी पक्षतेनेपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे करण्यात येत आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जर सरकारने विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव जाहीर केलं तर मी एका क्षणात त्याग करून आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देईन, असं विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे.
राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट हा २० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपदी ठाकरे गटाच्या नेत्याची निवड होऊ शकते. त्यात भास्कर जाधव यांच्या नावाची तसेच आदित्य ठाकरे यांच्या नावांचीही चर्चा होत आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं होतं. मात्र सरकारने आदित्य ठाकरे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली तर मी त्यांना पाठिंबा देईन, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच १० टक्के आमदार संख्या असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं, असं सांगितलं जात होतं. त्यामुळे मी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी काय कायदेशीर तरतुदी आहेत हे जाणून घेण्यासाठी सचिवांना पत्र लिहिलं होतं. त्यावेळी १० टक्के सदस्यसंख्येची कोणतीही अट नसल्याचं उत्तर मला सचिवालयाने दिलं आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला होता. तर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला होता. एवढंच नाही तर विरोधी पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळा इतपत जागाही जिंकता आल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणुकीला वर्ष लोटलं तरी राज्यात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती होऊ शकलेली नाही.