Sangam nose Prayagraj: १३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला. पण, २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली आणि दहापेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले. ज्या ठिकाणाकडे जाण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली, ते आहे संगम नोज. यालाच त्रिवेणी संगमही म्हटले जाते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाल्यापासूनच संगम नोज या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना संगम नोज येथे स्नान करण्याची इच्छा का असते? असा प्रश्न दुर्घटनेनंतर चर्चिला जात आहे.
संगम नोज काय आहे?
संगम नोज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव त्याच्या आकारावरून पडले आहे. प्रयाराजमध्ये संगम नोज अमृत स्नानासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. कारण याच ठिकाणी यमुना, अदृश्य झालेली सरस्वती आणि गंगा या तीन नद्यांच्या संगम होतो. बहुतांश संत, महंत याच ठिकाणी अमृत स्नान करतात.
तीन नद्यांचा संगम होतो, असे मानले जात असल्याने याला त्रिवेणी संगमही म्हटले जाते. त्रिवेणी घाट असेही संबोधले जाते. या संगमामुळेच प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांना याठिकाणी स्नान करायचे असते. मौनी अमावस्येच्या पर्वात इथे स्नान करायला मिळावं म्हणून भाविकांची गर्दी लोटली आणि चेंगराचेंगरी झाली.
भराव टाकून संगम नोजचे क्षेत्र वाढवले
संगम नोजला वाढवण्यातही आलेलं आहे. त्यासाठी भराव टाकला जातो. २०१९ च्या तुलनेत यावेळी गर्दी जास्त राहणार असल्याचा अंदाज होता. त्यामुळे संगम नोजचे क्षेत्र वाढवण्यात आले होते. पूर्वी तासाला ५० हजार लोक स्नान करू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती. पण, यावेळी तासाला २ लाख भाविक स्नान करू शकतील अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे.