बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार, केरळ सरकारचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 08:54 IST2022-11-15T08:54:02+5:302022-11-15T08:54:50+5:30
Kerala News : एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून हिणविले जाते. त्याला बॉडी शेमिंग असे म्हणतात. केरळ सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये बॉडी शेमिंगच्या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार, केरळ सरकारचा महत्त्वाचा निर्णय
कोची : एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून हिणविले जाते. त्याला बॉडी शेमिंग असे म्हणतात. केरळ सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये बॉडी शेमिंगच्या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये या जनजागृती मोहिमेचा समावेश करण्यात येईल.
ही माहिती त्या राज्याचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, बॉडी शेमिंग हा घृणास्पद प्रकार आहे. विवेकबुद्धी गमावलेले लोक असे प्रकार करतात व त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. एका पोस्टमध्ये शिवनकुट्टी यांनी म्हटले आहे की, माझ्या पोटाचा वाढलेला घेर कमी करा, अशी टिप्पणी एका व्यक्तीने केली होती. माझ्याबाबत बॉडी शेमिंगचा प्रकार घडला. तसा अनुभव अनेक लोकांना आला आहे.
‘बदलली शाळा’
शिवनकुट्टी यांच्या एका मित्राच्या भावाला त्याच्या रंगरूपावरून नेहमी चिडविले जात असे. याबाबत त्या मुलाने शिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर त्याच्या वर्गातील मुले आणखी चिडवू लागली. त्यामुळे मानसिक तणावाला सामोरे गेलेल्या या मुलाने नाइलाजाने अखेर आपली शाळा बदलली होती.