LAC आणि LoC म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या दोन्ही शब्दातील फरक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:45 IST2026-01-06T19:43:32+5:302026-01-06T19:45:02+5:30
LAC आणि LoC भारताच्या सुरक्षेशी संबंधित आहे.

LAC आणि LoC म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या दोन्ही शब्दातील फरक...
नवी दिल्ली : LAC आणि LoC हे दोन शब्द आपण अनेकदा बातम्यांमध्ये, चर्चांमध्ये किंवा सोशल मीडियावर ऐकत असतो. भारताच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या या दोन्ही शब्दांबाबत अनेकदा लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. LAC म्हणजे काय आणि LoC कशाला म्हणतात? या दोन्हीमध्ये फरक काय आहे?
LAC आणि LoC चा फुल फॉर्म काय?
LAC : Line of Actual Control (लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल)
LoC : Line of Control (लाईन ऑफ कंट्रोल)
LAC म्हणजे काय?
LAC (Line of Actual Control) ही भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून, दोन्ही देशांच्या सैन्याने ज्या भागापर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण ठेवले आहे, ती रेषा म्हणजे LAC.
LAC भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाशी संबंधित आहे. या रेषेवर स्पष्ट सीमारेषा अनेक ठिकाणी निश्चित नाही. दोन्ही देशांची सैन्ये ठराविक अंतर ठेवून गस्त घालतात. या परिसरात येथे बफर झोन असतो.
LoC म्हणजे काय?
LoC (Line of Control) ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य नियंत्रण रेषा आहे. LoC जम्मू-काश्मीरचा काही भाग भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागते. ही रेषा 1947-48 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर अस्तित्वात आली. ही रेषा प्रत्यक्ष युद्धविराम (Ceasefire Line) म्हणून ओळखली जाते. येथे कोणताही बफर झोन नाही, ही लाईव्ह बॉर्डर मानली जाते.
कायदेशीर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी
LAC ला 1993 आणि 1996 मध्ये भारत-चीन यांच्यात झालेल्या करारांमध्ये कायदेशीर मान्यता मिळाली.
LoC ही कोणतीही आंतरराष्ट्रीय सीमा नसून, काश्मीर प्रश्नाशी संबंधित युद्धविराम रेषा आहे.