बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:14 IST2025-11-08T16:12:22+5:302025-11-08T16:14:09+5:30
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचंड मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचे वेगवेगळे अर्थ काढले जाताहेत. अंदाज मांडले जाताहेत. याबद्दल प्रशांत किशोर यांनी त्यांचे गणित मांडले आहे.

बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान पार पडले. मागील अनेक निवडणुकांत इतकं मतदान झालेले नाही. त्यामुळे याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. अंदाज मांडले जात आहे. या वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याबद्दल प्रशांत किशोर यांनाही विचारण्यात आले. त्यांनी टक्का का वाढला आणि कोणता फॅक्टर महत्त्वाचा ठरला याबद्दलचे गणित मांडले.
प्रशाांत किशोर म्हणाले, "३० वर्षांमध्ये नाही, स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमधील हे सर्वात जास्त मतदान आहे. यातून दोन गोष्टी दिसत आहे की, पहिले म्हणजे जी गोष्ट मी मागील एक-दोन वर्षांपासून सांगत आहे की, बिहारमध्ये सात टक्क्यांहून अधिक जनतेला बदल हवा आहे. मागील २५-३० वर्षात राजकीय पर्यायाअभावी राजकारण आणि निवडणुकीबद्दल उदासीनता तयार झाली होती. लोकांकडे पर्याय नव्हता. आता जन सुराज्य पक्ष आल्यामुळे लोकांना पर्याय मिळाला आहे. वाढलेला जो मतांचा टक्का आहे, बदल घडवण्यासाठी मतदान झाले आहे.
कोणता फॅक्टर ठरला महत्त्वाचा
"दुसरा मुद्दा म्हणजे जे स्थलांतरित कामगार आहेत, जे छट सणानंतर थांबलेले आहेत. त्यांनी स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराला मतदान करायला लावले आहे. त्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जितके लोक म्हणत होते की, महिलांना दहा हजार दिले, त्यामुळे आम्ही जिंकू. पण, या निवडणुकीत महिला मतदार आहेच, पण त्यापेक्षा मोठा स्थलांतरित मजूर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे", असे विश्लेषण प्रशांत किशोर यांनी केले.
२ कोटी १० लाखांहून अधिक मतदान
"तुम्ही बघाल की, १४ नोव्हेंबरला इतिहास लिहिला जाईल. मोठंमोठे राजकीय पंडित हे सांगत नव्हते की, यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होईल. २ कोटी १० लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केलं आहे. अंदाज मांडणारे किती लोकांना भेटले असतील. कुणालाही माहिती नाही की, कुणी कुणाला मतदान केले. १४ तारखेला मतमोजणी होईल आणि तेव्हाच कळेल", असे प्रशांत किशोर म्हणाले.
"इथे कोणीही सुरक्षित नाहीये. कायद्याचे राज्य नाहीये. ज्याची लाठी, त्याची म्हैस. जे आतापर्यंत लोकांना सहन करावं लागत होतं. निवडणुकीच्या काळात मंत्री आणि नेत्यांना त्याला सामोरे जावे लागले आहे", असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.