पश्चिम बंगालवर पहिला ओपिनिअन पोल आला! तृणमूल अन् भाजपमध्ये २ टक्क्यांचाच फरक, कोण जिंकू शकते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:18 IST2026-03-16T12:15:33+5:302026-03-16T12:18:27+5:30
West Bengal Polls Opinion Poll 2026, Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ साठी MATRIZE-IANS चा ओपिनियन पोल जाहीर. टीएमसीला बहुमत पण भाजपचे तगडे आव्हान. पहा मतदानाच्या तारखा आणि सविस्तर आकडेवारी.

पश्चिम बंगालवर पहिला ओपिनिअन पोल आला! तृणमूल अन् भाजपमध्ये २ टक्क्यांचाच फरक, कोण जिंकू शकते?
कोलकाता: पश्चिम बंगालमधील सत्तेच्या संघर्षात तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू ही लढत तेवढी सोपी नसणार आहे. एका टक्क्याचा जरी फरक पडला तरी ममता यांची सत्ता जाण्याची शक्यता दिसत आहे.
ताज्या सर्वेक्षणानुसार आणि राजकीय विश्लेषणांनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या जवळ आहे. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेली टक्कर ममतांच्या चिंतेत भर टाकणारी ठरू शकते. IANS-Matrize चा ओपिनिअन पोल आला आहे. यानुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीत केवळ दीड-दोन टक्के मतांचा फरक दिसत आहे. यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
ओपिनियन पोलचा कल आणि जागांचे समीकरण
पश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांसाठी झालेल्या या सर्वेक्षणात टीएमसीला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता येईल, असा अंदाज आहे. टीएमसीला १५५ ते १७० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी झेप घेतली असून त्यांना १०० ते ११५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस, डावे पक्ष आणि अपक्ष अशा 'इतरांच्या' खात्यात केवळ ०५ ते ०७ जागा जाण्याची शक्यता आहे.
मतांची टक्केवारी आणि चुरस
या निवडणुकीत टीएमसी आणि भाजपमधील मतांच्या टक्केवारीतील फरक केवळ २ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षाला ४३ ते ४५% मते मिळू शकतात, तर भाजपला ४१ ते ४३% मते मिळण्याचा कल आहे. इतर पक्षांना १३ ते १५% मतांवर समाधान मानावे लागेल. ही अत्यंत कमी फरकाची लढत पाहता, ऐन निवडणुकीच्या वेळी कोणतीही लाट निकालांचे पारडे फिरवू शकते.
राजकीय विश्लेषण
ममता बॅनर्जी यांची 'लक्ष्मी भंडार' योजना आणि महिला मतदारांवरील त्यांची पकड टीएमसीसाठी जमेची बाजू ठरत आहे. मात्र, भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक प्रचार केला असून उत्तर बंगालमध्ये भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होताना दिसत आहे. २०११ मध्ये शून्य जागांवर असलेला भाजप २०२६ मध्ये १०० चा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली जाणे, हा ममता बॅनर्जींसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.
भाजपची मोठी झेप
२०११ आणि २०१६ च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये शून्य असलेल्या भाजपने २०२१ मध्ये ७७ जागांपर्यंत मजल मारली होती, आता २०२६ च्या निवडणुकीत ही संख्या १०० च्या पार जाण्याचा अंदाज आहे. बंगालमधील पारंपारिक डावे पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी या शर्यतीत मागे पडल्याचे दिसत असून, मुख्य लढत ही टीएमसी विरुद्ध भाजप अशीच होताना दिसत आहे. भाजपने १०० जागांचा आकडा पार करण्याचा अंदाज असून, उत्तर बंगालमध्ये त्यांचे पारडे जड दिसत आहे.