मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:44 IST2025-12-30T12:42:51+5:302025-12-30T12:44:21+5:30
West Bengal Election : अमित शाह यांनी आगामी वर्षात निवडणुका होणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांचा दौरा हाती घेतला आहे.

मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
West Bengal Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शाह सोमवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर दाखल झाले असून, राज्यातील भाजपाची स्थानिक पातळीवरील स्थिती तपासणे आणि निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखण्याचे काम काम करणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याही भेटी घेतील.
दिल्ली-बिहारनंतर मिशन बंगाल...
दिल्ली आणि बिहारमधील निवडणुकांनंतर आता भाजपाचे पूर्ण लक्ष 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांकडे वळले आहे. पुढील वर्षी देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री स्वतः मैदानात उतरले आहेत.
चार राज्यांचा दौरा; बंगालपासून सुरुवात
अमित शाह यांनी आगामी वर्षात निवडणुका होणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांचा दौरा हाती घेतला आहे. आसाममध्ये दोन दिवस सखोल चर्चा केल्यानंतर अमित शाह सोमवारी सायंकाळी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते तामिळनाडू आणि त्यानंतर केरळ दौऱ्यावर जाणार आहेत.
कोलकात्यात दोन दिवस मुक्काम
पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान अमित शाह मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस कोलकात्यात राहणार आहेत. या काळात ते भाजपाच्या नेत्यांबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कोलकाता कार्यालयालाही भेट देणार आहेत. या माध्यमातून बंगाल निवडणुकीसाठी सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.
भाजपाच्या कोअर ग्रुपसोबत मंथन
सोमवारी रात्री बंगालमध्ये पोहोचताच अमित शाह यांनी भाजपाच्या कोअर ग्रुपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक तयारीवर सखोल चर्चा झाली. मंगळवारी ते कोअर ग्रुपसोबतच पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधणार असून, त्यानंतर कोलकात्यात पत्रकार परिषद घेणार आहेत.
मंदिर दर्शन ते संघ कार्यालय भेट
मंगळवारी सायंकाळी अमित शाह कोलकात्यातील प्रसिद्ध इस्कॉन मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते आरएसएसच्या कोलकाता कार्यालयाला भेट देऊन संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बंगालशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
कार्यकर्ता मेळाव्यातून जोश
बुधवारी अमित शाह कोलकात्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याला संबोधित करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
‘हिंदू अस्मिता’ ठरणार प्रमुख मुद्दा
भाजप 2026 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ‘हिंदू अस्मिता’, तसेच बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार आणि तेथील राजकीय परिस्थिती हे प्रमुख मुद्दे बनवण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा बंगाल दौरा राज्यातील राजकारणात भाजपाच्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत देत आहे.