INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 16:40 IST2023-09-16T16:39:45+5:302023-09-16T16:40:41+5:30
टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे.

INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम!
पश्चिम बंगाल कांग्रेस आणि टीएमसी यांच्यात सध्या जबरदस्त खटके उडताना दिसत आहेत. प्रकरण एवढे तापले आहे की, तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) आपण अथवा सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखालील डाव्यांपैकी कुणा एकाची निवड करावी, असा मेसेज काँग्रेसला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत सूत्रांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली.
टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे.
‘अभिषेक बॅनर्जी प्रदेश काँग्रेसच्या निशाण्यावर’ -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काँग्रेस नेते सी. वेणुगोपाल यांच्यासह इंडिया आघाडीतील घटकंनी अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत एकता दाखवूनही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत.’ महत्वाचे म्हणजे, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना 13 सप्टेंबरला झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होता आले नव्हते. कारण त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवावे -
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, सीपीआय (एम)ची तर राजकीय मजबुरी आहे. पण प्रदेश काँग्रेसचे नेते या लाईनवर का चालत आहेत? अशा स्थितीत, पश्चिम बंगालमध्ये आमच्या सोबत जायचे की, सीपीआय (एम) सोबत, हे काँग्रेस नेतृत्वाला ठरवावे लागले.