"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:40 IST2025-12-26T19:32:27+5:302025-12-26T19:40:29+5:30
परराष्ट्र मंत्रालयाने आर्थिक फरार गुन्हेगारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
MEA Randhir Jaiswal: देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेले विजय माल्या आणि ललित मोदी यांनी नुकताच लंडनमध्ये पार्टी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. आम्ही भारताचे दोन सर्वात मोठे फरारी आहोत, असा टोला ललित मोदीने या व्हिडिओद्वारे भारताला मारला होता. या उद्धटपणाला आता भारत सरकारने अधिकृतरीत्या उत्तर दिले असून, कितीही कायदेशीर गुंतागुंत असली तरी या फरार गुन्हेगारांना भारतीय न्यायालयासमोर खेचून आणण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
विजय माल्याच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त लंडनमधील बेलग्रेव स्क्वेअर येथील आलिशान निवासस्थानी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. आयपीएलचा संस्थापक ललित मोदीने या पार्टीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात माल्या आणि मोदी एकत्र मद्यप्राशन करताना आणि भारताच्या यंत्रणेची थट्टा करताना दिसले. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर जनतेने केंद्र सरकारला "या फरारींना भारतात कधी आणणार?" असा जाब विचारला.
परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सरकारची भूमिका मांडली. "आम्ही विविध देशांच्या सरकारांशी सतत संपर्कात आहोत. प्रत्यार्पणाची प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीची असते, परंतु सरकार या फरार लोकांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांना भारतातील कायद्याचा सामना करावाच लागेल," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले.
#WATCH | Delhi: MEA spokesperson Randhir Jaiswal says, "We remain fully committed that people who are fugitive and wanted by law in India, return to the country. For this, we are in talks with several governments and processes are on... There are several layers of legalities… pic.twitter.com/HwxGzUUtIB
— ANI (@ANI) December 26, 2025
९,००० कोटींचा घोटाळा
किंगफिशर एअरलाईन्ससाठी घेतलेले सुमारे ९,००० कोटींचे कर्ज बुडवून विजय माल्या २०१६ मध्ये लंडनला पळाला. ब्रिटनने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असली तरी, कायदेशीर अपीलांमुळे तो अद्याप भारतात आलेला नाही. तर ललित मोदी आयपीएलमधील आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगच्या आरोपांनंतर २०१० मध्ये भारत सोडून पळाला. भारत सरकारने या दोघांनाही २०१९ मध्ये आर्थिक फरार गुन्हेगार घोषित केले आहे.
आलिशान जीवनशैली आणि जनतेचा संताप
ललित मोदीने व्हिडिओ शेअर करून नंतर तो हटवला, मात्र तोपर्यंत या व्हिडिओने सरकारवर टीका करण्याची संधी विरोधकांना दिली होती. लंडनमध्ये हे दोघेही अत्यंत आलिशान जीवन जगत असून भारतीय कायद्याला जुमानत नसल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले होते.