लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांसह वराची कार पडली तलावात, पाण्यात खाल्ल्या गटंगळ्या, अखेरीस पोहून वाचवला जीव, ग्रामस्थ ठरले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:32 IST2026-02-25T15:31:30+5:302026-02-25T15:32:30+5:30
Uttar Pradesh Accident News: लग्नासाठी वऱ्हाड घेऊन चाललेल्या नवरदेवाची आलिशान कार नियंत्रण सुटून तलावात पडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यात मंगळवारी घडली.

लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांसह वराची कार पडली तलावात, पाण्यात खाल्ल्या गटंगळ्या, अखेरीस पोहून वाचवला जीव, ग्रामस्थ ठरले देवदूत
लग्नासाठी वऱ्हाड घेऊन चाललेल्या नवरदेवाची आलिशान कार नियंत्रण सुटून तलावात पडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यात मंगळवारी घडली. या कारमध्ये नवरदेवासह सहा जण बसले होते. सुदैवाने तलावात पडलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही कार चकिया पोलीस चौकीच्या हद्दीतील बैरी गावातून बबुरी येथील आदर्श लॉनच्या दिशेने जात होती. ही कार बबुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली तेव्हा भरधाव वेगामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात जाऊन पडली. या घटनेनंतर घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. कार पाण्यात पडताच आजूबाजूल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात पडलेल्या लोकांना बाहेर काढले. या भरधाव वेग आणि बेफिकिरीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या कारचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.
दरम्यान, या अपघातानंतर कारमध्ये असलेला वर बाहेर पडून पोहत कसाबसा किनाऱ्यावर पोहोचला. तर कारमध्ये अडकलेल्या इतर लोकांना ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत बाहेर काढले. ग्रामस्थांनी वेळीच अपघातस्थळी धाव घेऊन मदत केली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पाण्यात बुडाल्याने अनेकांचे मोबाईल फोन आणि दागिने तलावात बुडाले. या अपघात प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.