"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:59 IST2026-01-14T17:56:26+5:302026-01-14T17:59:38+5:30
ओम प्रकाश राजभर लखनौ येथील निषाद पार्टीच्या संकल्प दिवस कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
लखनौ - सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या विधानाने राज्यात खळबळ माजली आहे. आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या ओम प्रकाश राजभर यांनी विना परवाना शस्त्र वाटणार असं म्हटलं आहे. इतकेच नाही तर त्यांनी त्याची तारीख आणि जागाही सांगितली आहे. ज्यालाही विना परवाना शस्त्रे हवीत त्याने १८ जानेवारीला आझमगडला येऊन घेऊ शकता असंही त्यांनी सांगितले आहे. एका मंत्र्याने अशा प्रकारे विधान केल्याने अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
ओम प्रकाश राजभर लखनौ येथील निषाद पार्टीच्या संकल्प दिवस कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. निषाद पार्टीच्या १३ व्या वर्धापनदिनी आयोजित या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे विधान केले. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संजय निषाद यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मच्छिमार समाज कुणाचीही व्होट बँक नाही. हा समाज केवळ नदी आणि तलावात मासेमारी करत नाही तर सरकार बनवणे आणि पाडणे हेदेखील जाणतो असं त्यांनी सांगितले.
तर ओम प्रकाश राजभर यांनी नवीन राष्ट्रीय सुहलदेव सेना म्हणजे आरएसएसची स्थापना केली आहे. येत्या १८ जानेवारीला त्यांच्या कमांडरांना विना परवाना शस्त्रे वाटू असं त्यांनी एका मुलाखतीत पुनरुच्चार केला. आमचा राजभर समाज लढाऊ वृत्तीचा आहे. या समाजाचा इतिहास संघर्षाचा आणि परदेशी आक्रमणाविरोधात लढण्याचा राहिला आहे. भारतात जे राहतात त्यांना वंदे मातरम बोललेच पाहिजे. भारतात जे खातात त्यांनी भारताची भाषा बोलली पाहिजे. त्याशिवाय आवश्यकता भासल्यास आमची सेना एके ४७ सारख्या शस्त्राने सज्ज होऊन पाकिस्तान आणि चीनच्या बॉर्डरवरही लढेल असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, ओम प्रकाश राजभर हे कायम त्यांच्या विधानांमुळे वादात सापडतात. आता त्यांच्या नवीन विधानावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे मात्र सत्ताधारी पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.