'लवकरच याचा बदला घेऊ'; योगी आदित्यनाथ यांच्यासह पोलिसांनाही धमकी, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:24 IST2024-12-25T13:23:45+5:302024-12-25T13:24:39+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंजाब पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांना धमकी देण्यात आली आहे. एक ऑडिओ पोलिसांना प्राप्त झाला आहे.

'लवकरच याचा बदला घेऊ'; योगी आदित्यनाथ यांच्यासह पोलिसांनाही धमकी, प्रकरण काय?
पाकिस्तानात लपून बसलेल्या खलिस्तानी झिंदाबाद फोर्सचा अतिरेकी रंजित सिंह नीटा याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणांना धमकी दिली आहे. उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये झालेल्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार झाले. त्यानंतर ही धमकी देण्यात आली असून, याचा लवकरच बदला घेऊ असे असे या ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले गेले आहे.
खलिस्तानी झिंदाबाद फोर्सचा अतिरेकी रंजित सिंह नीटा याने २.२३ मिनिटांचा ऑडिओ मेसेज पाठवला आहे. नीटाने पंजाब पोलिसांना म्हटले आहे की, ज्या तीन तरुणांचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे, त्यांच्याविरोधात कोणती एफआरआय दाखल झालेली होती?
जर ते पोलीस ठाण्यावर ग्रेनेड फेकून पळाले, असे म्हटले जाते. पण, त्यांच्याकडे एके ४७ रायफल्स होत्या. त्यांनी सामना केला असता. ते पळून जाणाऱ्यांपैकी नव्हते. पोलिसांनी षडयंत्र करून मारले, असे नीटाने म्हटले आहे. तीन तरूण शहीद झाले आहेत. याचा लवकरच बदला घेतला जाईल, अशी धमकी रंजित सिंह नीटाने दिली आहे.
पीलीभीतमध्ये झाले तिघांचे एन्काऊंटर
उत्तर प्रदेशातील पूरनपूरमध्ये असलेल्या मोठ्या कालव्याजवळ खलिस्तानी झिंदाबाद फोर्सच्या तीन अतिरेकी चकमकीत मारले गेले. पंजाब पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना त्यांच्या वास्तव्याची माहिती दिल्यानंतर त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला होता.
पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितल्यानंतर तिघांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. यात काही पोलीस जखमी झाले, तर तिन्ही अतिरेक्यांचा मृत्यू झाला.