डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:30 IST2024-12-27T12:29:53+5:302024-12-27T12:30:54+5:30

'पंतप्रधान आणि सरकार आपली चूक मान्य करायला तयार नाही'

We will fight till the end for the honor of Dr. Babasaheb Ambedkar Determination by Mallikarjuna Kharge | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा निर्धार 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा निर्धार 

राम मगदूम

बेळगाव : राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा यांनी अवमान केला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यच करायला तयार नाहीत, आम्ही डॉक्टर आंबेडकरांचा अवमान कदापिही सहन करू शकत नाही. डॉ. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांची विचारधारा जपण्यासाठी, तिच्या सन्मानासाठी या सरकारविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढू, असा निर्धार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केला.

बेळगाव येथे शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त आयोजित काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणी समितीमध्ये ते बोलत होते.

लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. कारण आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने निवडणूक नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलामुळे न्यायालयाने जी माहिती शेअर करण्याचे आदेश दिले होते, ते थांबवले जाऊ शकतात, असे करून सरकार काय लपवू पाहत आहे, असा सवालही खरगे यांनी केला.

कधी मतदारांची नावे यादीतून वगळली जातात, कधी त्यांना मतदान करण्यापासून रोखले जाते, कधी यादीतील मतदारांची संख्या अचानक वाढवली जाते, कधी मतदानाच्या शेवटच्या क्षणी मतांची टक्केवारी अनपेक्षितपणे वाढते. यामुळे पडणाऱ्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सापडत नाही, असेही खरगे म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानास्पद विधान केले. आम्ही त्याला आक्षेप घेतला, निषेध केला, निदर्शने केली. आता देशभर निदर्शने होत आहेत; पण पंतप्रधान आणि सरकार आपली चूक मान्य करायला तयार नाही. अमित शाहांकडून माफी आणि राजीनामा मागणे तर दूरच, त्यांनी आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केले आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असेही खरगे म्हणाले.

२०२५ हे पक्षाच्या संघटनात्मक सक्षमीकरणाचे वर्ष असेल. आम्ही संघटनेतील सर्व रिक्त पदे भरू. आम्ही उदयपूर घोषणेची पूर्ण अंमलबजावणी करू. पक्ष संघटनेला सर्व निवडणुका जिंकण्यासाठी सुसज्ज करू, असेही ते म्हणाले.

बेळगावहून नवा संदेश, नवा संकल्प घेऊन जाणार

‘आम्ही बेळगावहून नवा संदेश आणि नवीन संकल्प घेऊन परतणार आहोत. त्यामुळेच आम्ही या सभेला ‘नव सत्याग्रह’ असे नाव दिले आहे. कारण आज घटनात्मक पदावर असणारेही महात्मा गांधींच्या सत्याग्रहावर शंका घेत आहेत’, ज्यांनी संविधानाची शपथ घेतली तेच खोटेपणा पसरवत आहेत. सत्तेत असलेले लोक खोट्याचा आधार घेतात आणि आमच्यावर आरोप करतात. आम्हाला अशा लोकांना पराभूत करायचे आहे, असेही खरगे म्हणाले.

Web Title: We will fight till the end for the honor of Dr. Babasaheb Ambedkar Determination by Mallikarjuna Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.