'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:49 IST2025-05-20T16:46:03+5:302025-05-20T16:49:31+5:30
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील कमाही देवी येथील डोंगराळ भागातील वेहफता गावात चिनी क्षेपणास्त्र पीएल-१५ चे अवशेष सापडले.

'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशातील सीमेवर तणाव वाढला. यावेळी पाकिस्तानने चीनी क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. पाकिस्तानने सुमारे ८०० ते १००० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, ही क्षेपणास्त्रे भारतीय सशस्त्र दलांनी पाडली.
काही दिवसापूर्वी लष्कराच्या तीन महासंचालकांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हल्ल्यात शत्रू देशाने वापरलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या अवशेषांचे फोटो सार्वजनिकपणे प्रदर्शित केले. पाकिस्तानने भारताविरुद्ध तुर्की ड्रोनसह चिनी PL-15E क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, जो आमच्या हवाई संरक्षण प्रणालीने हाणून पाडला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
PL-15E हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
PL-15E हे चिनी बनावटीचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, हे सीमावर्ती भागात पाडण्यात आले. या क्षेपणास्त्राचे तुकडे पंजाबच्या शेतात सापडले. पंजाबमधील होशियारपूरमध्ये एका ठिकाणी हे क्षेपणास्त्र शेतात पडलेले आढळले, ते सक्रियही झाले नव्हते. सुरक्षा दलांनी त्याची चौकशी केली. यात ते चीनचे प्रगत क्षेपणास्त्र PL-15E असल्याचे समोर आले. मीडिया रिपोर्ट्समध्ये, या क्षेपणास्त्राची अंदाजे किंमत प्रति युनिट सुमारे १० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हे प्रगत लांब पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये गणले जाते.
आता जपान, फ्रान्स आणि अनेक फाइव्ह आयज देशांच्या गुप्तचर संस्थांनी भारताकडून या क्षेपणास्त्राचे अवशेष मागितले आहेत. चिनी बनावटीच्या या क्षेपणास्त्राची पुनर्प्राप्ती ही एक मोठी उपलब्धी आहे. कारण ते त्याच्या प्रहार क्षमता आणि श्रेणीबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सक्षम असेल, याचा वापर रणनीती विकसित करण्यासाठी तसेच चिनी क्षेपणास्त्र उत्पादन तंत्रज्ञान मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो.
फ्रान्स आणि जपान, हे उच्च-तंत्रज्ञानाच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यांना या गुप्त चिनी PL-15E क्षेपणास्त्राच्या अवशेषातून केवळ त्याच्या संरचनेबद्दल आणि तांत्रिक बाबींबद्दलच नवीन अंतर्दृष्टी मिळतील असे नाही तर परदेशी क्षेपणास्त्राचे रडार सिग्नेचर, मोटर स्ट्रक्चर, मार्गदर्शन तंत्रज्ञान आणि कदाचित त्याच्या AESA रडारची रचना समजून घेण्यास देखील मदत होईल.