'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:40 IST2025-05-08T15:39:50+5:302025-05-08T15:40:22+5:30

ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत असल्याचे मत मांडले.

'We are with you', opposition supports government in all-party meeting after Operation Sindoor | 'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

Operation Sindoor: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर नंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी हवाई हल्ल्याचे कौतुक केले आणि सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आणि लष्कराच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा जाहीर केला. 

बैठकीच्या सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्या वतीने ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. पण, संरक्षणमंत्र्यांनी या बैठकीत ऑपरेशनल तपशील दिले नाहीत. 

ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या या बैठकीत, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सरकारला उद्देशून म्हणाले की, तुम्ही जे काही काम करत आहात ते करत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. बैठकीत त्यांनी राफेल पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याचाही उल्लेख केला, परंतु कोणीही सरकारला या मुद्द्यावर उत्तर मागितले नाही. सर्वपक्षीय बैठकीनंतर बाहेर आलेले काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, आम्ही सरकारचे म्हणने ऐकले, आमचा सरकारला पाठिंबा आहे. 

ही एकतेची वेळ - राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, आम्ही एकजूट आहोत आणि सुरुवातीपासूनच सरकारसोबत आहोत. काही विषय आहेत, पण ठीकय आहे. ही एकतेची वेळ आहे. आम्ही सर्वांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. 

यावेळी काँग्रेस अध्यक्षांसह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी बठिंडा येथे लढाऊ विमान पाडण्यात आल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचा मुद्दा उपस्थित केला. पण, सरकारने यापूर्वीच अशाप्रकाची घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

ऑपरेशन अजूनही सुरू आहे - किरण रिजिजू
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले की, ही कारवाई अजूनही सुरू आहे, त्यामुळे त्यावर स्वतंत्रपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे आणि प्रत्येकाने अत्यंत गांभीर्याने आपले विचार व्यक्त केले आहेत. देशातील सर्व राजकीय पक्ष ऑपरेशन सिंदूरबाबत कौतुक करत आहेत, ही देखील खूप चांगली गोष्ट आहे. सर्व राजकीय पक्षांनी परिपक्वता दाखवली आहे. आपल्या देशातील राजकीय पक्षांनी दाखवून दिले आहे की, भारत एक परिपक्व लोकशाही आहे. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानले.

बैठकीला कोण उपस्थित होते
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. सरकारकडून राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि किरण रिजिजू यांच्याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे देखील बैठकीला उपस्थित होते. विरोधी पक्षाकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी भाग घेतला. याशिवाय प्रफुल्ल पटेल, संबित पात्रा, संजय सिंह संजय झा, प्रेमचंद गुप्ता, जॉन ब्रिटास यांचाही सहभाग होता.

Web Title: 'We are with you', opposition supports government in all-party meeting after Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.