आम्ही शेतकऱ्यांची मुले! मागण्या मान्य न झाल्यास पद्म, अर्जुन पुरस्कार परत करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 00:36 IST2020-12-03T00:36:14+5:302020-12-03T00:36:40+5:30
खेळाडूंचा इशारा; केंद्र सरकारला शनिवारपर्यंतची मुदत

आम्ही शेतकऱ्यांची मुले! मागण्या मान्य न झाल्यास पद्म, अर्जुन पुरस्कार परत करणार
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या ५ डिसेंबरपर्यंत मान्य केल्या नाहीत तर अर्जुन व पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा खेळाडू तसेच अन्य मान्यवरांनी केंद्र सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तारसिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजनसिंग चिमा, हॉकीपटू राजबिर कौर आदी खेळाडू आता सरसावले आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत तर पद्म व अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती भवनासमोर ठेवून आम्ही ते परत करू, असा इशारा दिल्याचे या खेळाडूंनी सांगितले आहे. आंदोलक शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात नव्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्याबद्दल हरयाणा व केंद्रातील सरकारचा माजी खेळाडूंनी तीव्र निषेध केला आहे.
आम्ही शेतकऱ्यांची मुले
बास्केटबॉलपटू साजनसिंग चिमा यांनी सांगितले की, आम्ही खेळाडू असलो तरी शेतकऱ्यांचीही मुले आहोत. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जे प्रयत्न सुरू आहेत ते आम्हाला आवडलेले नाही. शेतकऱ्यांना नवे कृषी कायदे नको असतील तर ते त्यांच्यावर लादण्याचा केंद्र सरकार का प्रयत्न करत आहे, असाही सवाल त्यांनी केला.