देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:47 IST2026-04-05T14:45:16+5:302026-04-05T14:47:16+5:30
पुढील ४८ तासांत राज्यातील विविध शहरांमधील कमाल तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
नवी दिल्ली - पश्चिमी वाऱ्यांच्या बदलामुळे देशभरातील हवामानात अचानक मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. राजधानी दिल्लीसोबतच उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. इतकेच नाही तर गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोणकोणत्या राज्यांत पडणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या काळात उत्तर पश्चिम भारतात पाऊस, जोरदार वारा आणि गारपीट सुरू राहील. आज ५ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. ७ आणि ८ एप्रिल रोजी हवामान पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. ८ एप्रिल रोजी बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. ५ ते ८ एप्रिल या कालावधीत केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
दिल्ली-यूपीतही पावसाचा कहर
दिल्लीतही मेघगर्जनेसह पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ ते ७ एप्रिल या काळात हवामान बदल होत राहतील. आज संध्याकाळी हलका पाऊस, रिमझिम आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. उत्तर प्रदेशात गेल्या ४८ तासांपासून वादळ आणि पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आणखी एक अपडेट जारी केले असून त्यानुसार रविवारी काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर इतर भागांमध्ये निरभ्र आकाश राहील असा अंदाज वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील विविध शहरांमधील कमाल तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Realised Hailstorm over Met-Subdivisions during past 24 hours till 0830 Hrs IST of Today-05th April, 2026
— India Meteorological Department (@Indiametdept) April 5, 2026
❖ Hailstorm activity reported at isolated places over Himachal Pradesh, Uttarakhand, Punjab, Haryana, East Rajasthan, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Vidarbha and Telangana.… pic.twitter.com/i1TBaa3dme
दरम्यान, ५ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये काळ्या ढगांच्या हालचालीसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात आज हवामान निरभ्र राहील. ६ एप्रिल रोजी हवामान विभागाने सर्व ७५ जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये ठेवले आहे. ७ एप्रिलपासून राज्यात पुन्हा ढग जमा होऊ लागतील असं लखनौ हवामान केंद्राकडून माहिती देण्यात आली आहे. तर बिहारमध्ये ५, ६ आणि ९ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ७ आणि ८ एप्रिल रोजी मेघगर्जना आणि गारपिटीची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत राहील असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.