'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:30 IST2025-08-24T14:25:26+5:302025-08-24T14:30:04+5:30
Voter Adhikar Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी मत चोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोग आणि सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.

'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
Rahul Gandhi Voter Adhikar Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव सध्या व्होट अधिकार यात्रेनिमित्त बिहारचा दौरा करत आहेत. आपल्या यात्रेदरम्यान, राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत. आजही अररिया येथे दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल यांनी पुन्हा एकदा आरोप केला की, देशभरात मते चोरीला जात आहेत आणि निवडणूक आयोग यावर गप्प आहे. तर, तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाला "गोदी आयोग" म्हटले.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला प्रश्न
राहुल गांधी म्हणाले की, आता कोट्यवधी लोक असे मानतात की, मते चोरीला जात आहेत. आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदार यादी मागितली, पण दिली नाही. मते कशी चोरीला जातात, हे आम्ही कर्नाटकात दाखवून दिले. मात्र, आम्ही बिहारमध्ये हे होऊ देणार नाही. मी कर्नाटकातील महादेवपुरा संबंधित डेटा ठेवला आणि निवडणूक आयोगाला विचारले की, १ लाख बनावट मतदार कुठून आले? निवडणूक आयोगाचे उत्तर अद्याप आलेले नाही.
LIVE: Joint press briefing by Shri @RahulGandhi and other Mahagathbandhan leaders | Bihar. https://t.co/e0S3Gjha8X
— Congress (@INCIndia) August 24, 2025
निवडणूक आयोगाने मला प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र आयोगाने अनुराग ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र मागितले नाही. मी बनावट मतदारांबद्दल बोललो, अनुराग ठाकूर यांनीही तेच सांगितले, परंतु निवडणूक आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र न मागणे हे दर्शविते की, निवडणूक आयोग तटस्थ नाही. बिहारमधील SIR ही संस्थात्मक मत चोरीची एक पद्धत आहे. बिहारमध्ये ६५ लाख लोकांची नावे वगळण्यात आली, परंतु भाजप एकही तक्रार करत नाही. कारण निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि भाजप यांच्यात भागीदारी आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
निवडणूक आयोग भाजपचा कार्यकर्ता- तेजस्वी यादव
तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले, आता निवडणूक आयोग एक लॅपडॉग आयोग बनला आहे. ते भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. आजपर्यंत आम्ही इतका खोटारडा पंतप्रधान कधीच पाहिला नाही. अफवा पसरवणे हे त्यांचे काम आहे. जेव्हा ते बिहारमध्ये आले तेव्हा त्यांनी घुसखोरांचा उल्लेख केला, परंतु निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात घुसखोराचे एकही नाव नाही, अशी टीका त्यांनी केली.