हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:55 IST2025-08-28T10:54:19+5:302025-08-28T10:55:21+5:30
Virar Building Collapse: विरारमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेदरम्यान घडलेली एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे.

हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
विरारमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेदरम्यान घडलेली एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. या दुर्घटनेत इथे राहणाऱ्या जोईल कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला आहे. तर वडील बेपत्ता आहेत. दु:खद बाब म्हणजे जोईल कुटुंब त्यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करत असतानाच अचानक इमारत कोसळून ही दुर्घटना झाली.
विरार पूर्व परिसरात असलेल्या विजयनगर येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये ओंकार जोईल आणि त्यांचं कुटुंब राहत होते. दुर्घटना घडली त्याच दिवशी ओंकार जोईल यांची लेक उत्कर्षा हिचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. जोईल कुटुंबीयांनी घर सजवलं होतं. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचे फोटो नाकेवाईकांना पाठवण्यात आले. मात्र केक कापून अवघी पाच मिनिटं झाली असतानाच रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा एक भाग कोसळून जवळच्या चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत उत्कर्षा जोईल आणि तिच्या आईचा मृत्यू झाला. तर ओंकार जोईल हे दुर्घटना झाल्यापासून बेपत्ता आहेत.
दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी आपला जीव धोक्यात घालत सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी विरार आणि नालासोपारा येथील रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे. विरार पोलिसांनी या दुर्घटनेसाठी जबाबदार बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.