हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:03 IST2025-10-03T06:02:12+5:302025-10-03T06:03:13+5:30
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले.

हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
नागपूर : काही लोक जाणूनबुजून एकतेवर प्रहार करण्याचे प्रयत्न करतात. श्रद्धास्थाने, महापुरुष व प्रार्थनास्थळांसंबंधात अनादराच्या घटना घडतात. लहानसहान बाबींवरून हिंसाचार होतो. एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी हे घडवले जाते. हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले.
नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित संघाच्या शताब्दी वर्षातील शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
‘संघात जातीभेद किंवा अस्पृश्यता नाही’
संघाचे स्वयंसेवक भारतीय परंपरेतील एकता आणि सातत्य यांना महत्त्व देतात. संघामध्ये अस्पृश्यता किंवा जातीभेद नाही. तथापि, समाजात याबद्दल अनेक गैरसमज आहेत, जे दूर करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघाच्या सामाजिक सौहार्दाच्या भावनेने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी सांगितले.
महात्मा गांधींबाबत संघमंचावर गौरवोद्गार
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. महात्मा गांधी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत. स्वातंत्र्योत्तर ‘स्व’ आधारित भारताची संकल्पना दृढ करणाऱ्या तत्वज्ञानींमध्ये महात्मा गांधी यांचे आदराचे स्थान आहे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
शांतता, स्थैर्य आणि प्रगती भारताच्या समृद्धीसाठी आवश्यक
आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे. अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात, तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. परंतु, हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. शेजारी देशांमध्ये आपल्या स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यापेक्षा शांतता, स्थिरता, प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे सरसंघचालक म्हणाले.