पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:00 IST2025-07-09T15:00:37+5:302025-07-09T15:00:53+5:30
Viral Marriage Video: काही दिवसांपूर्वी याच भागात काकीने पुतण्याशी लग्न केले होते. हे लग्न पती आणि लहान मुलीसमोरच झाले होते. या महिलेने मुलीला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला होता.

पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले
आजकाल प्रेमप्रकरण आणि लग्न हे सामान्य बाब झाली आहे. यातही आता सासू-जावई, सावत्र आई-मुलगा, मेहुणी-भावोजी अशा नातेसंबंधांतूनही प्रेमप्रकरणांतून पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी पत्नीचे देखील तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याचे प्रकार घडत असतात. अशातच आता बिहारच्या जमुईमध्ये लग्न करण्यासाठी पळून जात असलेल्या प्रेमी युगुलाला पकडून जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकाराचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. मंगळवारी रात्री जमुई रेल्वे स्थानकावर गावकऱ्यांनी या दोघांना पकडून त्यांचे लग्न लावून दिले. कोयबा गावातील सचिन कुमार आणि जावातरी गावातील संगिता कुमारी यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. राँग नंबरवरून त्यांची ओळख झाली. पुढे बोलणे वाढत गेले आणि नंतर दोघे प्रेमात पडले होते.
मंगळवारी सचिन आणि संगिता हे पळून जाऊन लग्न करण्यासाठी घराबाहेर पडले होते. याची खबर गावकऱ्यांना लागताच त्यांनी दोघांना शोधण्यास सुरुवात केली. हे दोघेही रेल्वेची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर सापडले. या दोघांना पकडून थोडे बाजुला नेण्यात आले. अंधार असल्याने मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात सचिनच्या हातात कुंकू देण्यात आले, गावकऱ्यांनी सोबत हारही आणले होते. ते दोघांना देण्यात आले आणि एकमेकांच्या गळ्यात घालून दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी याच भागात काकीने पुतण्याशी लग्न केले होते. हे लग्न पती आणि लहान मुलीसमोरच झाले होते. या महिलेने मुलीला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला होता. हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आता हा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे.