विजयवाड्याच्या दुर्गा मंदिरात पैशांचा पाऊस, १८ दिवसांत करोडो रुपयांची देणगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 17:12 IST2024-08-13T17:10:21+5:302024-08-13T17:12:55+5:30
Vijayawada Durga Temple : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात श्रावण महिन्यात पैशांचा पाऊस पडत आहे.

file photo
विजयवाडा : सध्या श्रावण महिना सुरु असून देशातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. अशातच आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात श्रावण महिन्यात पैशांचा पाऊस पडत आहे. दुर्गा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मोठी देणगी दिली आहे.
श्री दुर्गा मल्लेश्वर स्वामीवराला देवस्थानम येथे भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या रोख रक्कमेसह सोने आणि चांदीच्या वस्तू मोजण्याचे काम कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सुरु आहे. गेल्या १८ दिवसांत दुर्गादेवीला दान म्हणून दिलेली रक्कम २,९७,४७,६६८ रुपये इतकी जमा झाली आहे. म्हणजेच, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दररोज सरासरी १६,६२,६४८ रुपये जमा झाले आहेत. याशिवाय, ४१० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदी दानपेटीतून देवीला अर्पण करण्यात आली आहे.
याचबरोबर, दुर्गा देवीच्या दानपेटीत परकीय चलन सुद्धा दान म्हणून जमा होत आहे. यामध्ये ८७५ ऑस्ट्रेलियन डॉलर, ७६५ अरब दिरहम, ६८१ यूएस डॉलर, २८० थाई बात, १०७ सौदी रियाल, ६२ मलेशियन रिंगिट, ५० दक्षिण आफ्रिकन रेंड, ३५ कॅनेडियन डॉलर, ३० युरो, २० ब्रिटिश पौंड, १७ कतारी रियाल, ९ बेन्स भाविकांनी दानपेटीत दान केले आहेत. तसेच, ऑनलाइन ई-दानद्वारे ५६,३२० रुपयांची देणगी मिळाल्याचे मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंदिरात विशेष सोहळ्याचे आयोजन
दुसरीकडे, मंदिराचे कार्यकारी अधिकारी रामाराव यांनी सांगितले केले की, या महिन्याच्या २३ तारखेला विजयवाडा दुर्गम्मा मंदिरात सामूहिक वरलक्ष्मी व्रत आयोजित केले जाईल. तसेच या महिन्याच्या १६ तारखेला दुर्गामा देवी वरलक्ष्मीच्या रूपात भक्तांना दिसणार आहे. या महिन्याच्या १८ ते २० तारखेपर्यंत दुर्गामा मंदिरात पवित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.