Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:18 IST2025-10-08T16:17:52+5:302025-10-08T16:18:49+5:30
भूस्खलनामुळे रुग्णालयाचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तेव्हा डॉ. मोल्ला हे दोरीच्या मदतीने बामणडांगा परिसरात अडकलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचले.

Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
पश्चिम बंगालच्या उत्तर भागात सततच्या मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि पूर आला आहे. या आपत्तीदरम्यान, नगरकाटाचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर (BMOH) इरफान मोल्ला यांनी मानवतेचं दर्शन घडवलं. भूस्खलनामुळे रुग्णालयाचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तेव्हा डॉ. मोल्ला हे दोरीच्या मदतीने बामणडांगा परिसरात अडकलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचले.
डॉ. इरफान मोल्ला यांनी बचाव पथक आणि सुरक्षा उपकरणांच्या मदतीने झिपलाइनचा वापर केला. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये डॉ. मोल्ला हळूहळू दोरीच्या मदतीने दरी ओलांडताना आणि नंतर जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी जमिनीवर उतरताना दिसत आहेत.
All Heroes don’t wear capes…
— 𝐑𝐢𝐣𝐮 𝐃𝐮𝐭𝐭𝐚 (@DrRijuDutta_TMC) October 7, 2025
True Heroes are those that help people in the darkest of times. One such Hero was spotted swinging by a rope amidst the landslide affected North Bengal…
The incident took place in Nagrakata.
The person swinging by a rope over a gorge is 𝐃𝐫.… pic.twitter.com/SWLqgazHhO
व्हिडिओ शेअर करताना लोकांनी "सर्वच हिरो टोपी घालत नाहीत. खरे हिरो तेच असतात जे लोकांना त्यांच्या कठीण काळात मदत करतात" असं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या कॅप्शनमध्ये "जेव्हा एखादा डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून, दोरीला लटकून, धोकादायक परिसर ओलांडून पूरग्रस्तांवर उपचार करतो, तेव्हा तो खरोखरच आपल्या सलाम करण्यास पात्र आहे. मानवतेचे सर्वोच्च उदाहरण" असं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये विनाशकारी भूस्खलन आणि पुरामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. दार्जिलिंग, मिरिक, सुकियापोखरी आणि जोराबुंगलो हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहेत. शेजारच्या नेपाळमध्येही मृतांचा आकडा ५० च्या वर गेला आहे, जिथे इलाम जिल्हा सर्वात जास्त प्रभावित आहे. अलीपुरद्वार आणि इतर प्रभावित भागात एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये भरपाई आणि नागरकाटामध्ये प्रत्येक बाधित कुटुंबातील एका सदस्याला होमगार्ड म्हणून विशेष नोकरी देण्याची घोषणा केली आहे. मदत आणि बचाव कार्य पूर्ण वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी माती हलवणारी यंत्रसामग्री आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. या आपत्तीमुळे दार्जिलिंग, मिरिक आणि डुअर्समधील पर्यटन उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे.