Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 07:40 IST2025-07-09T07:39:33+5:302025-07-09T07:40:14+5:30

Video : राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्घाटनापूर्वीच एक नवीन बांधलेला राज्य महामार्ग वाहून गेला आहे.

Video rajasthan newly built state highway road washed away before inauguration | Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल

Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्घाटनापूर्वीच एक नवीन बांधलेला राज्य महामार्ग वाहून गेला आहे. पावसानेच पोलखोल केली. उदयपुरवती जिल्ह्यातील बाघुली भागात ही संतापजनक घटना घडली. रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर येथून जाणाऱ्या कटली नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाह खूप वेगाने वाढला.

नदीचा प्रवाह इतका वेगवान झाला की, नव्याने बांधलेला रस्ता एका झटक्यात खचला आणि त्याचा मोठा भाग पाण्यात वाहून गेला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागात ८६ मिमी पाऊस पडला. कटली ही नदी सिकर झुंझुनू आणि चुरू जिल्ह्यांमधून वाहते. अलिकडच्या काळात नदीवरील अतिक्रमण वाढत आहे. राज्य प्रशासनाने अतिक्रमण आणि बेकायदेशीर वाळू आणि रेती उत्खनन माफियांपासून नदीचे संरक्षण करण्यासाठी मोहीम देखील सुरू केली होती.

रस्ता वाहून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राज्य महामार्गाचा रस्ता उद्घाटनापूर्वीच पाण्यात वाहून जाताच, बाघुली आणि जहाज या शेजारील गावातील लोक हे दृश्य पाहण्यासाठी धावले आणि या घटनेचा व्हिडीओ बनवला.हे व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये रस्ता वाहून गेल्यामुळे विजेचा एक खांबही पाण्यात पडला हे स्पष्टपणे दिसून येते.

सहा महिन्यांपूर्वी बाघुली आणि जहाजला झुंझुनू आणि सिकरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५२ ला जोडण्यासाठी राज्य महामार्ग बांधण्यात आला होता. रविवारी रस्त्याचा एक भाग अचानक खचला आणि पाण्यात वाहून गेला, त्यानंतर रस्ता बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, रस्त्याच्या बांधकामात असं कोणतं साहित्य वापरलं गेलं की तो लगेच खचला आणि एकाच झटक्यात वाहून गेला? सार्वजनिक बांधकाम विभागाची एक टीम रस्त्याची पाहणी करणार आहे. 

Web Title: Video rajasthan newly built state highway road washed away before inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.