Video: Brave journalist, zealous commando, video of soldier's release goes viral of rakeshwar singh | Video : बहाद्दर पत्रकार, जिगरबाज कमांडो, जवानाच्या सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Video : बहाद्दर पत्रकार, जिगरबाज कमांडो, जवानाच्या सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

रायपूर - छत्तीसगडमध्येनक्षलवादी हल्ल्यादरम्यान नक्षलवाद्यांनी पकडलेल्या सीआरपीएफ कमांडोची सुटका करण्यात आली. त्यापूर्वी नक्षलवाद्यांनी दोन पानांचे निवेदन जारी करुन सीआरपीएफचे कोब्रा कमांडो राकेश्वर सिंग मनहास त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तसेच, बस्तर येथील एकापत्रकाराला फोनवरुन जवाना ताब्यात असल्याचे कळवले होते. तेव्हापासून जवानाची सुटका होईपर्यंत येथील बहाद्दर पत्रकाराने मोलाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे जवानाच्या सुटेकसाठी स्वत: पत्रकार नक्षलावाद्यांच्या छावणीत गेले होते. 

बंदी घालण्यात आलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी एक निवेदन जारी केले आहे की, 3 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासूनच बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे. राज्य सरकारने चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले. नक्षलवांद्यांच्या तावडीतील जवानाला सुखरुप कॅम्पमध्ये पोहोचविण्याचं काम बस्तर येथील स्थानिक पत्रकारांनी केलं आहे. त्यामध्ये, बस्तर का पत्रकार नावाने ओळखला जाणार मुकेश चंद्रकर याने मोलाची भूमिका बजावली. 

मुकेश यांच्यासह त्यांचे काही सहकारी मित्र नक्षलवाद्यांच्या छावणीत गेले होते. तेथे, गेल्यानंतर नलक्षवाद्याच्या म्होरक्याशी संवाद साधून त्यांनी कोब्रा कमांडो राकेश्वर सिंह यांची सुटका केली. त्यानंतर, आपल्या स्वत:च्या दुचाकीवरुन राकेश्वर सिंह यांना सुखरुप कॅम्पमध्ये पोहोचविण्यात आले. बहाद्दर पत्रकार मुकेश चंद्रकर यांच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक आहे. त्यासोबतच, जवानाला गाडीवरुन घेऊन येतानाचा त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी मुकेश चंद्रकर यांच्या कार्याला सलाम केला असून मोहीम फत्ते झाल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे. 


 

पत्नीने पंतप्रधान मोदींकडे केली होती विनंती

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत 22 जवान शहीद झाले. तर, राकेश्वर सिंह मनहास हे जवाना बेपत्ता झाल्याची उघडकीस आले होते. त्यांतर, राकेश्वर यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आपला नवरा घरी सुखरुप परतावा म्हणून विनंतीही केली होती. त्यानंतर, नक्षलावाद्यांकडून या जवानाचा फोटो जारी करण्यात आला. त्यामध्ये जवान सुखरुप असल्याचे दिसून आले. नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाही भारतीय सैन्यातील कमांडो राकेश्वर सिंह यांचा निडरपणा एका फोटोतून स्पष्ट दिसत आहे. नक्षली लपून-छपून, कट कारस्थान रचून हल्ला करतात. मात्र, भारतीय सैन्याचे जवान निडर होऊन त्यांचा सामना करतात, हे या छायाचित्रावरुन स्पष्ट झाले. सीआरपीएफनेही या फोटोला दुजोरा दिला होता. 

सुटकेनंतर जवानाने सुरक्षा दलात काम करु नये

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याची सुटका करायची असल्यास एक अट समोर ठेवली आहे. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट नक्षलवाद्यांनी ठेवली होती. त्यानंतर सरकारने मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर जवानाला सोडण्यात आलं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Brave journalist, zealous commando, video of soldier's release goes viral of rakeshwar singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.