Video - "मोदींना शिव्या देणाऱ्यांना का देऊ?", भाजपा नेत्याने मुस्लिम महिलांकडून परत घेतलं ब्लँकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:19 IST2026-02-23T13:18:55+5:302026-02-23T13:19:50+5:30
Video - ब्लँकेट वाटप कार्यक्रमादरम्यान भाजपा नेते आणि माजी खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांच्यावर मुस्लिम महिलांशी भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Video - "मोदींना शिव्या देणाऱ्यांना का देऊ?", भाजपा नेत्याने मुस्लिम महिलांकडून परत घेतलं ब्लँकेट
राजस्थानमधील टोंक येथे ब्लँकेट वाटप कार्यक्रमादरम्यान भाजपा नेते आणि माजी खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांच्यावर मुस्लिम महिलांशी भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुखबीर सिंह जौनापुरिया महिलांचा धर्म विचारून त्यांच्याकडून ब्लँकेट परत घेताना आणि त्यांना तिथून निघून जाण्यास सांगताना दिसत आहेत. "जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देतात, त्यांना ब्लँकेट मिळणार नाही, त्यांना मी का देऊ?" असं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
व्हायरल व्हिडिओमध्ये सुखबीर सिंह जौनापुरिया सुरुवातीला महिलांना ब्लँकेट वाटताना दिसतात. मात्र एका महिलेचे नाव विचारल्यानंतर ती मुस्लिम असल्याचं समजताच माजी खासदार आपल्या सहकाऱ्यांना तिला ब्लँकेट न देण्याचे निर्देश देतात. इतकंच नाही तर ज्या महिलांना आधीच ब्लँकेट दिलं गेलं होतं, त्यांच्याकडूनही ते परत घेण्यास जौनपुरिया सांगतात. उपस्थित काही ग्रामस्थांनी या प्रकाराला विरोध केला असता "हा माझा पर्सनल कार्यक्रम आहे, मी कोणालाही देईन" असं उत्तर त्यांनी दिलं.
BJP के पूर्व सांसद सुखवीर सिंह जौनपुरिया टोंक में कम्बल वितरण कर
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) February 23, 2026
रहे थे
तभी उन्होंने एक गरीब मुस्लिम महिला को बेइज़्ज़त कर उसका कंबल वापस ले लिया
असल में तो दिल और विचारों से दरिद्र यह छोटे और घिनौने मन का आदमी ख़ुद है
सही विरोध किया लोगों ने, मुँह पे दे मारना चाहिए था कंबल pic.twitter.com/q9VB2heasr
व्हिडिओमध्ये अनेक लोक भाजपा नेत्याला मुस्लिम महिलांना ब्लँकेट देण्यास नकार दिल्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. या महिलांनी तासनतास वाट पाहिली, पण शेवटी त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं, असंही लोक सांगत आहेत. यावर सुखबीर सिंह यांनी आपण वाद घालू इच्छित नसल्याचं सांगत तिथून काढता पाय घेतला. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हायरल व्हिडिओ 'X' वर शेअर करत माजी खासदारांवर मुस्लिम महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "भाजपाचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया टोंकमध्ये ब्लँकेट वाटत होते. तेव्हाच त्यांनी एका गरीब मुस्लिम महिलेचा अपमान केला आणि तिच्याकडून ब्लँकेट परत घेतलं. खरं तर ही संकुचित आणि घृणास्पद मानसिकता असलेली व्यक्ती स्वतः मन आणि विचाराने खूप गरीब आहे. लोकांनी विरोध करून योग्यच केलं. त्यांनी ब्लँकेट थेट जौनपुरियांच्या तोंडावर फेकायला हवं होतं."
हा वाद वाढल्यानंतर सुखबीर सिंह जौनापुरिया यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, "एका विशिष्ट धर्माचे लोक मोदीविरोधी आहेत आणि त्यांच्याबद्दल निराधार विधानं करत असतात. सर्व हिंदू भाजपाला पाठिंबा देतात हेही खरं नाही, पण एका विशिष्ट धर्माचे लोक कधी मोदींच्या रॅलीला येतील का?" याच दरम्यान, जौनपुरिया यांनी असा दावाही केला की, ते आपल्या कम्युनिटी किचनमधून अन्न वाटप करताना किंवा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटताना कोणताही भेदभाव करत नाहीत.