VIDEO: १५ वर्षीय मुलीच्या मागे साप लागला; एका महिन्यात ६ वेळा चावला; गावात दहशत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 13:39 IST2025-08-31T13:38:29+5:302025-08-31T13:39:42+5:30

या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे.

VIDEO: 15-year-old girl was chased by a snake; bitten 6 times in a month; terror in the village | VIDEO: १५ वर्षीय मुलीच्या मागे साप लागला; एका महिन्यात ६ वेळा चावला; गावात दहशत...

VIDEO: १५ वर्षीय मुलीच्या मागे साप लागला; एका महिन्यात ६ वेळा चावला; गावात दहशत...

UP News:उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण गाव दहशतीत आहे. सिरथू तहसील परिसरातील भैनसहापर गावातील १५ वर्षीय रिया मौर्य हिला एका महिन्यात सहा वेळा साप चावला आहे. रियाचे वडील राजेंद्र मौर्य यांचा दावा आहे की, २२ जुलै २०२५ रोजी शेतात जात असताना, सापाने रियाला पहिल्यांदाच चावले. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर ती बरी झाली, परंतु नंतर वारंवार ही घटना घडली.

चार दिवसांत ४ वेळा चावला
रियाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, १३ ऑगस्ट रोजी सापाने तिला पुन्हा चावले. प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी तिला प्रयागराजला रेफर केले. रिया कशीबशी पुन्हा एकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आली. मात्र, २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या सकाळपर्यंत सापाने रियाला चारवेळा दंश केला. कधी तिला आंघोळ करताना तर कधी घरकाम करताना साप चावला. 

पीडित रिया म्हणते की, तिला चावलेला साप खूप मोठा आणि गडद काळ्या रंगाचा. चावल्यानंतर सुमारे १ तासानंतर ती बेशुद्ध पडते. जेव्हा तिला शुद्ध येते, तेव्हा ती कधी हॉस्पिटलच्या बेडवर असते तर कधी भूतविरोध करणाऱ्या तांत्रिकाजवळ असते. सततच्या घटनांमुळे घाबरून, रियाची लहान भावंडे आता त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी गेली आहेत. संपूर्ण कुटुंब झोपडीसारख्या कच्च्या घरात राहते आणि आता तेथून स्थलांतर करण्याचा विचार करत आहे.

तीन वेळा रुग्णालयात आणले
सिरथू सामुदायिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अखिलेश सिंह यांनीही सर्पदंशाच्या या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की रिया मौर्यला तीन वेळा रुग्णालयात आणण्यात आले. प्रत्येक वेळी तिच्या पायावर सर्पदंशाच्या खुणा आढळल्या. मुलीला वारंवार साप चावला हे आश्चर्यकारक आहे. 

गावातील लोकही आता घाबरले आहेत. गावकऱ्यांचा आरोप आहे की, माहिती असूनही वन विभागाने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला नाही किंवा प्रशासनाने कुटुंबाला मदत केली नाही. हे प्रकरण आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे. 
 

Web Title: VIDEO: 15-year-old girl was chased by a snake; bitten 6 times in a month; terror in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.