उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 22:49 IST2025-08-19T21:10:30+5:302025-08-19T22:49:08+5:30

मागील निवडणुकीवर नजर टाकली तर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली होती तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली होती

Vice Presidential Election: Who has the stronger lead in the fight between CP Radhakrishnan and Sudarshan Reddy? | उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

नवी दिल्ली - उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. एनडीएने महाराष्ट्रातील राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सी.पी राधाकृष्णन यांना उमेदवार बनवले आहे तर विरोधी पक्षाने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने ही निवडणूक रंजक बनली आहे.

लोकसभेतलं संख्याबळ किती?

या निवडणुकीसाठी लागणारं संख्याबळ पाहिले तर सत्ताधारी पक्षाकडे पारडे झुकल्याचे दिसून येते. सध्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण ७८२ खासदार या निवडणुकीत मतदान करतील. या निवडणुकीत जिंकण्यासाठी ३९२ चा बहुमताचा आकडा पार करावा लागेल. लोकसभेत एकूण ५४३ खासदार आहेत. ज्यात एनडीएकडे २९३ आणि विरोधी इंडिया आघाडीकडे २३४ खासदार आहेत. इतर छोट्या पक्षांचे १५ सदस्य लोकसभेत आहेत. 

राज्यसभेतलं गणित काय?

राज्यसभेत एकूण २४० खासदारांपैकी एनडीएकडे १३४ खासदारांचे समर्थन आहे तर विरोधकांकडे ७८ खासदार आहेत. याठिकाणी छोटे आणि इतर पक्ष मिळून २८ सदस्य आहेत. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा मिळून सत्ताधारी पक्षाकडे एकूण ४२७ खासदार आहेत. जे बहुमतापेक्षा ३५ मतांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे विरोधकांकडे ३१२ खासदार आहेत याचा अर्थ बहुमतासाठी ८० मतांची कमी आहे. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ४३ मते आहेत. मात्र ते वगळले तरीही सत्ताधारी पक्षाचे पारडे जड दिसत आहे. 

मागील निवडणुकीवर नजर टाकली तर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली होती तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली होती. त्यावेळी संसदेत ५५ खासदारांनी मतदान केले नव्हते. आता एनडीए आणि इंडिया आघाडीचे उमेदवार दोघेही दक्षिण भारतातून येतात. राधाकृष्णन तामिळनाडू तर सुदर्शन रेड्डी तेलंगणातून येतात. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून आणि गोव्यात लोकायुक्त काम केल्याने सुदर्शन रेड्डी यांची प्रतिमा निष्कलंक आहे. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असून ते भाजपाचे जुने नेते आहेत. 

दरम्यान, संख्याबळ पाहिले तर सी.पी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विरोधकांनीही चांगल्या प्रतिमेचे सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरले आहे. परंतु संख्याबळ कमी असल्याने त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. मात्र विरोधकांना अपेक्षा आहे की, एनडीएतील काही घटक पक्षांचे खासदार सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देऊ शकतात. विशेषत: दक्षिण भारतातील पक्ष टीडीपी, वायएसआर काँग्रेसवर लक्ष आहे. जर प्रादेशिक अस्मितेची जोड सुदर्शन रेड्डी यांना मिळाली तर निवडणूक रंजक बनेल. परंतु सध्यातरी याची शक्यता फार कमी दिसत आहे.  

Web Title: Vice Presidential Election: Who has the stronger lead in the fight between CP Radhakrishnan and Sudarshan Reddy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.