उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:40 IST2025-09-09T10:38:39+5:302025-09-09T10:40:27+5:30
या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
नवी दिल्ली - उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आज सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएकडून सी.पी राधाकृष्णन आणि विरोधी इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे. त्यात मतदानाआधीच बीजेडी, बीआरएस आणि अकाली दलाने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ही लढत आणखी रंगतदार बनली आहे.
संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. संख्याबळाचा विचार केल्यास सध्या एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांचे पारडे जड आहे. परंतु इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांना पुढे करून विरोधकांनी डाव टाकला. रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशचे असल्याने प्रादेशिक अस्मितेवरून चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांची कोंडी करण्याचं काम विरोधकांनी केले. त्यात आता मतदानापूर्वी विरोधी पक्षातील ३ पक्षांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल तटस्थ
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बीजेडी पार्टी, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसनंतर आता पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांनी ना सी.पी राधाकृष्णन, ना इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा किंवा विरोध केला नाही. त्यामुळे विजय-पराभवातील आकडे बदलले आहेत. बीआरएसकडे राज्यसभेत ४, बीजू जनता दलाकडे ७ आणि शिरोमणी अकाली दलाकडे १ लोकसभा, २ राज्यसभा सदस्य आहेत. तिन्ही पक्षांचे खासदार मतदानात सहभागी होणार नाहीत.
काय होणार परिणाम?
बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल खासदारांची संख्या एकूण १४ आहे. सध्या लोकसभेत ५४२ आणि राज्यसभेत २३९ खासदार आहेत. एकूण ७८१ खासदारांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे कमीत कमी ३९१ खासदारांचा पाठिंबा असेल तो उमेदवार निवडणुकीत विजयी होईल. आता या तिन्ही पक्षांनी मतदानात भाग न घेतल्याने दोन्ही सभागृहातील खासदारांची संख्या ७६७ इतकी होईल. त्यामुळे विजयासाठी ३८४ खासदारांची गरज आहे. हे तिन्ही पक्ष विरोधी आहेत परंतु मागील ११ वर्षापासून ते सरकारशी जवळीक साधत आलेत. अकाली दल एनडीएचा भाग होती. परंतु बीजेडी, बीआरएस आघाडीत नसतानाही सरकारला पाठिंबा देत होती. सध्या एनडीएच्या बाजूने ४३६ खासदारांचा पाठिंबा दिसून येतो, तर सुदर्शन रेड्डी यांच्यासोबत ३२४ खासदार आहेत. या दोघांमध्ये ११२ मतांचा फरक दिसून येत आहे. मात्र निकालानंतर खरे चित्र लोकांसमोर येणार आहे.