उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:15 IST2025-08-16T09:15:20+5:302025-08-16T09:15:23+5:30
Vice President Election 2025: रविवारी एनडीएची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
Vice President Election 2025: जगदीप धनखड यांनी अचानकपणे दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. जगदीप धडखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या रिक्तपदासाठी ०९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएकडून कोण उमेदवार असेल, याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा संसदीय मंडळाची रविवारी बैठक होणार आहे, यामध्ये पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात येणार आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराचे नाव निश्चित करतील. संसद भवनात झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली होती.
अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी रविवारी एनडीएकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांना भाजपाकडून संधी दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, राम मोहन, लल्लन सिंग, अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.