५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:44 IST2025-11-10T12:44:18+5:302025-11-10T12:44:45+5:30
अमितने काही दिवसांपूर्वी ११ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आणि एका रात्रीत त्याचं नशीब बदललं.

५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
राजस्थानमधील कोटपुतली येथील भाजीवाला अमित सेहरा सध्या जोरदार चर्चेत आहे. अमितने काही दिवसांपूर्वी ११ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आणि एका रात्रीत त्याचं नशीब बदललं. लॉटरी जिंकल्यापासून अमितला धमक्यांचे फोन येत आहेत. अज्ञात लोक पैशांची मागणी करत आहेत, तर काही जण त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अमितने आता त्याचा मोबाईल बंद केला आहे आणि तो आपल्या कुटुंबासह दूर निघून गेला आहे.
३२ वर्षीय अमित सेहरा कोटपुतलीमध्ये रस्त्याच्या कडेला भाजी विकतो. त्याने पंजाबमधील भटिंडा येथून ५०० रुपयांचे लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. त्यानंतर त्याला ११ कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस जाहीर झालं आणि अमितचं नशीब फळफळलं. अमितने त्याचा मित्र मुकेशकडून ५०० रुपये उधार घेऊन तिकीट काढलं होतं. अमित म्हणाला, "जेव्हा मी तिकीट खरेदी केलं तेव्हा मला कल्पना नव्हती की माझं नशीब फळफळेल.
भाजीवाल्याला आल्या धमक्या
लॉटरी जिंकल्याची बातमी पसरताच अमितची सर्वत्र चर्चा रंगली. अमितला विविध नंबरवरून फोन कॉल आणि मेसेज येऊ लागले. लॉटरी कंपनी किंवा सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणारे अनेक लोक त्याच्याकडून कर, दाव्याचे शुल्क किंवा देणग्यांच्या नावाखाली पैसे मागू लागले. काहींनी त्याला धमकीचे मेसेजही पाठवले.
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
अमितने सांगितलं की, सुरुवातीला काही कॉलकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर फोन येण्याचं प्रमाण खूप वाढलं. काही लोकांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. म्हणून त्याने फोन बंद केला आणि कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी राहायला गेला. एवढी मोठी रक्कम मिळणे हे स्वप्नासारखं आहे. तो हे पैसे त्याच्या कुटुंबाच्या गरजांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे.