युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:42 IST2025-10-06T17:41:50+5:302025-10-06T17:42:32+5:30
संभल हिंसाचारादरम्यान अनुज चौधरी चर्चेत आले होते.

युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार...
UP News:उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये सोमवारी सकाळी झालेल्या एका नाट्यमय पोलिस चकमकीत दोन कोटी रुपयांच्या लूट प्रकरणातील फरार आरोपी नरेश ठार झाला. या चकमकीत राज्यातील दबंग पोलिस अधिकारी एएसपी अनुज चौधरी यांनाही गोळी लागली. सुदैवाने त्यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, रामगढ पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजीव दुबे जखमी झाले.
नेमकं प्रकरण काय?
सविस्तर माहिती अशी की, 30 सप्टेंबर रोजी मक्खनपूर परिसरात जीके कंपनीच्या कॅश व्हॅनमधून दोन कोटी रुपयांची लूट झाली होती. कानपूरहून आग्राकडे जात असताना घुनपई गावाजवळ ही घटना घडली होती. चारचाकी वाहनांमधून आलेल्या दरोडेखोरांनी ड्रायव्हरला मारहाण करुन रोकड भरलेली व्हॅन घेऊन पसार झाले होते. घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती.
पोलिसांनी तपास करुन मुख्य आरोपी नरेशसह सहा दरोडेखोरांना अटक केली आणि त्यांच्याकडून १ कोटीहून अधिकची रोकड, आयफोन, बाईक खरेदीच्या पावत्या आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली होती. मात्र चौकशीदरम्यान नरेश रविवारी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला. फरार नरेशच्या अटकेसाठी डीआयजी शैलेश पांडे यांनी ₹५०,००० चे बक्षीस जाहीर केले होते.
अशी झाली चकमक
एएसपी अनुज चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथक त्याच्या शोधात निघाले असताना मक्खनपूर परिसरात पोलिस आणि नरेश आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. गोळीबारात एएसपी अनुज चौधरी यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर गोळी लागली, तर निरीक्षक संजीव दुबे जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नरेश गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कोण आहेत अनुज चौधरी?
मुझफ्फरनगरमधील बहेरी गावातील रहिवासी अनुज चौधरी कुस्तीपटू आहेत. त्यांनी 2002 आणि 2010 च्या राष्ट्रीय खेळांमध्ये दोन रौप्य पदके आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य पदके जिंकली. ते 1997 ते 2014 पर्यंत राष्ट्रीय विजेता होते. त्यांना 2001 मध्ये लक्ष्मण पुरस्कार आणि 2005 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कामगिरीनंतर त्यांना 2012 मध्ये क्रीडा कोट्यातून उत्तर प्रदेश पोलिसात पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली.
काही दिवसांपूर्वीच त्यांना IPS पदावर बढती देण्यात आली आहे. सध्या ते फिरोजाबाद जिल्ह्यात तैनात आहेत. संभलमधील कार्यकाळात चौधरी यांची खूप चर्चा झाली होती. जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर त्यांच्या कडक भूमिकेमुळे दंगलखोरांना चांगलीच चपराक बसली होती. शिवाय, किष्किंधा रथयात्रेदरम्यान गदा घेऊन जातानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील एका मुलाखतीत त्यांचे कौतुकही केले होते.