Accident: लग्नासाठी निघाले, पण वाटेतच मृत्यूनं गाठलं; ३ भावंडं जागीच ठार, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:25 IST2026-02-26T15:19:16+5:302026-02-26T15:25:28+5:30

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. ऐरायण मशायक गावाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर भीषण धडक होऊन एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Uttar Pradesh Fatehpur Road Accident: 3 of a Family Killed, 2 Seriously Injured in Head-on Collision Near Airayan Mashayak | Accident: लग्नासाठी निघाले, पण वाटेतच मृत्यूनं गाठलं; ३ भावंडं जागीच ठार, नेमकं काय घडलं?

Accident: लग्नासाठी निघाले, पण वाटेतच मृत्यूनं गाठलं; ३ भावंडं जागीच ठार, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. ऐरायण मशायक गावाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर भीषण धडक होऊन एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण लग्नासाठी जात असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुसेनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्राहा गावातील रहिवासी श्याम सिंग (वय, ४५), मंथल सिंग (वय,४०), गोरेलाल (वय, ३२) आणि राजेंद्र सिंग (वय, ३०) हे एकाच मोटारसायकलवरून सुलतानपूर घोष परिसरात एका लग्न समारंभासाठी जात होते. संध्याकाळच्या सुमारास घाईत असताना ऐरायण मशायक गावातील शीतगृहाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोतीलाल पासवान (वय, ५०) यांच्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मोटारसायकलींचा चक्काचूर झाला. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर दूरवर फेकले गेले. या अपघातात श्याम सिंग, मंथल सिंग आणि गोरेलाल या तिघांचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र सिंग आणि दुसऱ्या दुचाकीवरील मोतीलाल पासवान हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्राहा गावात ही बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ज्या घरातून लग्नासाठी आनंदाने चौघे जण बाहेर पडले, तिथे आता अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ आली आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आक्रोशाने परिसरातील वातावरण हेलावून गेले आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासानुसार, एकाच दुचाकीवर चार जण स्वार असल्याने समतोल बिघडला असावा किंवा अतिवेगामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title : विवाह के लिए जा रहे तीन भाइयों की दर्दनाक मौत

Web Summary : उत्तर प्रदेश में शादी के लिए जा रहे तीन भाइयों की मोटरसाइकिल दुर्घटना में मौत हो गई। दो अन्य गंभीर रूप से घायल। ऐरायन मशायक गांव के पास हादसा। पुलिस जांच कर रही है, गति या बाइक पर चार लोगों के कारण असंतुलन का संदेह।

Web Title : Tragedy Strikes: Three Brothers Killed En Route to Wedding

Web Summary : In Uttar Pradesh, a horrific motorcycle collision killed three brothers heading to a wedding. Two others were seriously injured. The accident occurred near Airayan Mashayak village. Police are investigating the cause, suspecting speeding or imbalance due to four people on one bike.