उत्तर प्रदेशात योगींच्या मंत्र्याचाच मोबाईल चोरट्यांनी केला लंपास, रेल्वे प्रवासात घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:17 IST2025-01-30T10:16:32+5:302025-01-30T10:17:04+5:30
Uttar Pradesh Crime News: योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदावर आल्यापासून उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्याचे दावे केले जात असतात. मात्र या दाव्यांना धक्का देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील वनमंत्र्यांचा मोबाईल रेल्वे प्रवासादरम्यान, चोरट्यांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशात योगींच्या मंत्र्याचाच मोबाईल चोरट्यांनी केला लंपास, रेल्वे प्रवासात घडला प्रकार
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदावर आल्यापासून उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारल्याचे दावे केले जात असतात. मात्र या दाव्यांना धक्का देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील वनमंत्र्यांचा मोबाईल रेल्वे प्रवासादरम्यान, चोरट्यांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपीला पकडले आहे. तसेच तपासणीदरम्यान, त्याच्याकडे आणखी तीन मोबाईल सापडले. आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर येथून हावड्याकडे जात असलेल्या पंजाब मेलमधून उत्तर प्रदेशचे पर्यावरण राज्यमंत्री डॉ. अरुण कुमार हे बरेली येथून लखनौला जात होते. ते ए-१ डब्यातून प्रवास करत होते. त्याचदरम्यान, चोरट्याने त्यांचा मोबाईल लांबवला. मोबाईल चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी तपासाची सूत्रे तातडीने फिरवत आरोपीला धावत्या ट्रेनमधूनच ताब्यात घेतले. त्याच्याकडून मंत्रिमहोदयांच्या एस२७ अल्ट्रा मोबाईलसह तीन फोन जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
मंत्र्याचा फोन चोरीला गेल्याची घटना समोर आल्यानंतर लखनौपर्यंत आरपीएफ आणि जीआरपीला अलर्ट करण्यात आलं. प्रकरणाचं गांभीर्य पाहून तपासणीसाठी चार पथकं तैनात करण्यात आली. तसेच शाहजहांपूर आणि लखनौदरम्यान, आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
आरोपीचं नाव साहिल असून, तो गोजाजाली वनभूलपुरा, नैनीताल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त केले आहेत. त्यामधील एक फोन हा मंत्रिमहोदयांचा होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ह्या प्रकरणी शाहजहांपूर जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीविरोधात कारवाई करण्यात आली आहे.