आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:24 IST2025-12-25T19:23:47+5:302025-12-25T19:24:23+5:30
Crime News: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील महावतपूर बावली गावात घडली आहे.

आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील महावतपूर बावली गावात घडली आहे. मृत तरुणाचं नाव सतनाम असून, मृत तरुणीचं नाव गुड्डन असं आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सतनाम हा काही दिवसांपूर्वी गावात आला होता. तसेच तो गुड्डन हिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. तसेच तिच्यावर संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी करायचा. यावरूनच या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे.
दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशी देखील दोघांमध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर सतनाम याने रागाच्या भरात कट्टा बाहेर काढला आणि गुड्डन हिच्यावर भर गावातच गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून संपूर्ण गाव हादरला. मात्र काय झालंय हे कळण्यापूर्वीच सतनाम तिथून पळून गेला. त्यानंतर काही वेळाने सतनाम याने आपल्या घरातील अंगणात गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना घडली तेव्हा त्याचे कुटुंबीय मोलमजुरीसाठी गेलं होतं. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनास्थळावरून एक कट्टाही जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.