Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 13:23 IST2018-10-05T13:17:16+5:302018-10-05T13:23:37+5:30
देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट
नवी दिल्ली: देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दिल्ली काबीज करण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे या राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह महाआघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यात काँग्रेसला यश आल्यास उत्तर प्रदेशातभाजपाला मोठा धक्का बसू शकतो, अशी आकडेवारी एबीपी माझा आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये मायावतींचा बसपा स्वतंत्र लढणार आहे. या राज्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला बसपासोबत आघाडी करण्यात यश आल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या हाताला बसपा आणि समाजवादी पक्षाची साथ मिळाल्यास भाजपाप्रणीत एनडीएच्या तब्बल 49 जागा घटतील. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपाने मित्रपक्षासह निवडणूक लढवत 80 पैकी तब्बल 73 जागा खिशात घातल्या होत्या. मात्र काँगेसला महाआघाडी करण्यात यश आल्यास भाजपा आणि मित्रपक्षांच्या जागा 24 वर येतील. तर महाआघाडीला 56 जागांवर यश मिळेल, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.
वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मायावतींनी या राज्यांमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतही मायावतींनी हाच पवित्रा कायम राखल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँग्रेसला महाआघाडी करण्यात अपयश आल्यास भाजपाला मित्रपक्षांसह तब्बल 70 जागांवर यश मिळेल. तर काँग्रेसप्रणित युपीएला अवघ्या 2 जागा मिळतील आणि उर्वरित 8 जागांवर इतर पक्षांना यश मिळेल.
उत्तर प्रदेशात बुवा-बबुवा अर्थात मायावती आणि अखिलेश एकत्र आले तरीही काँग्रेस आणि भाजपाला धक्का बसू शकतो. समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी आघाडी केल्यास त्यांना 42 जागांवर यश मिळू शकेल. या परिस्थितीत भाजपा आणि मित्रपक्षांना 36 जागांवर समाधान मानावं लागेल. यामुळे सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसेल. काँगेसप्रणित यूपीएला अवघ्या 2 जागा मिळतील. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.