वकिलाचे मेहुण्याने केले अपहरण, गाडीत बेदम मारहाण करत केली हत्या; हादरवणारं कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:51 IST2025-01-26T16:47:41+5:302025-01-26T16:51:10+5:30

उत्तर प्रदेशात एका वकिलाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Uttar Pradesh Brother in law killed the lawyer kidnapped him in Scorpio car | वकिलाचे मेहुण्याने केले अपहरण, गाडीत बेदम मारहाण करत केली हत्या; हादरवणारं कारण समोर

वकिलाचे मेहुण्याने केले अपहरण, गाडीत बेदम मारहाण करत केली हत्या; हादरवणारं कारण समोर

UP Lawyer Death: उत्तर प्रदेशात बस्ती येथे वकिलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपींनी वकिलाला स्कॉर्पिओ कारमध्ये नेऊन बेदम मारहाण केली. यानंतर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून ते पळून गेले. आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ वकिलाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होती. डॉक्टरांनी तपासणी करुन वकिलाला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी वकिलाच्या मेहुण्याला अटक केली आहे. पोलीस तपासात मेहुण्यानेच वकिलाच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झालं.

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे चंद्रशेखर यादव (५०) नावाच्या वकिलाची अपहरण करुन हत्या करण्यात आली. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर यादव घरी येत होते. त्यावेळी स्कॉर्पिओमधून आलेल्या काही लोकांनी त्यांचे अपहरण केले. यादव यांना बेदम मारहाण केल्यानंतर स्कॉर्पिओतल्या आरोपींना त्यांना वाल्टरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर गावाजवळ फेकून दिले. जखमी चंद्रशेखर यादव यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यादव यांचा मेहुणा रणजित यादव याला अटक करण्यात आली. तर रविवारी पोलिसांनी आणखी एक आरोपी विनय उर्फ ​​सोहित याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी अर्धा डझन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक तपासातच यादव यांनी बहिणीची केस लढवल्याचा राग त्यांचा मेहुणा रणजितला होता आणि याच रागातून त्याने ही हत्या केल्याचे समोर आले. चंद्रशेखर यादव हे बस्तीमध्ये वकिली करत होते. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते बोलेरोने घरी परतत होते. नारायणपूर तिवारी-भुडकुलगंज रोडवर स्कॉर्पिओतल्या गुंडांनी बोलेरो थांबवून त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी चंद्रशेखर यांना मारहाण करून बोलेरोमधून बाहेर काढले आणि त्यांना स्कॉर्पिओमध्ये बसवलं. लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ स्कॉर्पिओचा शोध सुरू केला. दुसरीकडे स्कॉर्पिओतल्या आरोपींना अपहरण केलेल्या यादव यांना गणेशपूरजवळ फेकून तेथून पळ काढला.  चंद्रशेखर यांची बहीण सोनमती हिचा विवाह रणजीत यादव याच्याशी झाला होता. मात्र दोघांमधील मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले होते. चंद्रशेखरच्या बहिणीने तिचा पती आणि सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चंद्रशेखर यादव हे या खटल्याची बाजू मांडत होते. या प्रकरणात लवकरच निर्णय येणार होता. त्यामुळे रणजित आणि त्याचे कुटुंबिय घाबरले होते. त्यामुळे त्यांनी चंद्रशेखर यांना संपवण्याचा कट रचला.

दरम्यान, चंद्रशेखर यांची हत्या करण्यासाठी हल्लेखोर सायंकाळीच महाराजगंज येथे पोहोचले होते. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सायंकाळपासून रस्त्याच्या कडेला उभी होती. घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून ते आधीच घटनेच्या ठिकाणी उपस्थित होते ही बाब समोर आली आहे.

Web Title: Uttar Pradesh Brother in law killed the lawyer kidnapped him in Scorpio car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.