एकाच घरात आढळले ६ मृतदेह, माथेफिरूनं पोटच्या २ मुलांची हत्या करून अख्ख घर पेटवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:52 IST2025-10-01T14:52:23+5:302025-10-01T14:52:43+5:30
Uttar Pradesh Mass Murder: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक घटना समोर आली.

एकाच घरात आढळले ६ मृतदेह, माथेफिरूनं पोटच्या २ मुलांची हत्या करून अख्ख घर पेटवलं!
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक घटना समोर आली. एका व्यक्तीने पोटच्या दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह आणि स्वतःच्या कुटुंबाला घरात कोंडून घराला आग लावली. घटनेत कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण बहराइच परिसरात शोककळा पसरली आहे.
मौर्य असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत मौर्यसह त्याची पत्नी, दोन मुली आणि दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. शिवाय, घरात बांधलेली गुरंढोरं आणि ट्रॅक्टरदेखील जळून खाक झाले. या घटनेबद्दल अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी मौर्यने त्याच्या दोन मुलांना लसूण कापणीसाठी आपल्या घरी बोलावले. घरी आल्यावर त्याने आपल्या दोन्ही मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर त्यांचे मृतदेह आणि आपल्या कुटुंबाला घरात कोंडून त्याने संपूर्ण घराला आग लावली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचले तेव्हा गावकरी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, सामूहिक हत्या आणि आत्मदहनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलिसांचा तपास सुरू आहे.