US-Israel-Iran war: निर्यातीचा चहा जातोय उतू.. उत्पादनाची किटली झाली थंड; भारतातून किती दशलक्ष किलो होते निर्यात.. जाणून घ्या
By अविनाश कोळी | Updated: March 6, 2026 13:15 IST2026-03-06T13:13:42+5:302026-03-06T13:15:35+5:30
उत्पादक, निर्यातदारांच्या डोईवर संकटाचे ढग

US-Israel-Iran war: निर्यातीचा चहा जातोय उतू.. उत्पादनाची किटली झाली थंड; भारतातून किती दशलक्ष किलो होते निर्यात.. जाणून घ्या
अविनाश कोळी
सांगली : आखाती देशांमध्ये भारतातून जाणाऱ्या चहाला युद्धाच्या वणव्यामुळे मोठी झळ बसली आहे. निर्यातीचा चहा उतू जात असल्याने निर्यातक्षम चहाच्या उत्पादनांची शेगडीही थंड करावी लागत आहे. एकीकडे पोर्टमध्ये अडकलेला माल निर्यातदारांना गोदामांमध्ये भरावा लागत असून, भारतातील उत्पादन आता १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आणावे लागले आहे. वाढता खर्च, अडकलेली बिले यामुळे उत्पादक, निर्यातदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
युद्धामुळे चहाच्या व्यापाराला जोरदार दणका बसला आहे. शिपिंग मार्ग बंद झाल्याने निर्यातदारांनी त्यांचा माल आता वेअर हाऊसमध्ये शिफ्ट केला आहे. मालाची सुरक्षितता पाहताना त्यासाठीच्या खर्चाची मोठी तजवीज करावी लागत आहे. युद्ध किती दिवस चालेल, याची कल्पना नसल्याने अनिश्चिततेचे ढग भारतीय चहा व्यापारावर दाटले आहेत.
जगभरात होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी मोठा हिस्सा हा मध्यपूर्व आशियातील देशातील आहे. त्यामुळे मालाच्या उत्पादनाला मोठा ‘ब्रेक’ लागला आहे. शिपिंग कंपन्यांनी प्रति कंटेनर ३,२०० रुपये आपत्कालीन सरचार्ज लावल्याने निर्यात थांबविल्याची माहिती पुणे येथील निर्यातदार श्रीधर अय्यर यांनी दिली.
उलाढालीला मोठा दणका
टी बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारताने जगभरात २५७.८८ दशलक्ष किलो, तर २०२५ मध्ये सुमारे २८० दशलक्ष किलो चहा निर्यात केला. २०२६च्या निर्यातीचा आलेख युद्धजन्य परिस्थितीमुळे खाली घसरत आहे.
आखाती देशांत १०० दशलक्ष किलोवर निर्यात
दरवर्षी भारतातून आखाती देशांमध्ये १०० ते १२० दशलक्ष किलो चहा निर्यात होतो. एकूण निर्यातीपैकी हा हिस्सा ३५ ते ४० टक्के आहे.
निर्यात होणाऱ्या चहाचे उत्पादन आम्ही सध्या १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. पोर्टमधील माल आता वेअर हाऊसमध्ये शिफ्ट केला आहे. किती काळ युद्ध चालेल, माहिती नाही. त्यामुळे खर्चाचा भार वाढत आहे. चहा उत्पादक, निर्यातदारांसाठी हा काळ मोठ्या अडचणींचा आहे. - श्रीधर अय्यर, चहा निर्यातदार, पुणे
सध्या जलवाहतूक बंद झाल्याने चहाचा परदेशातील प्रवास बिकट बनला असून, आर्थिक नुकसानाला उत्पादक व निर्यातदारांना सामोरे जावे लागत आहे. दराची, बिलाची अनिश्चितताही सहन करावी लागणार आहे. -राजेशभाई शहा, सभासद, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशन