लेकीसमोर बापाची निर्घृण हत्या, शरीराचे 15 तुकडे; पत्नीने प्रियकराच्या मदतीने सौरभला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:58 IST2025-03-20T18:58:13+5:302025-03-20T18:58:32+5:30
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सौरभ राजपूत हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे.

लेकीसमोर बापाची निर्घृण हत्या, शरीराचे 15 तुकडे; पत्नीने प्रियकराच्या मदतीने सौरभला संपवले
UP Crime :उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झालेल्या सौरभ राजपूत हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पतीची निर्दयी हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे केरुन टाकीत भरले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. सौरभच्या हत्येनंतर सहा वर्षीय मुलगी पिहूने शेजाऱ्यांना पापा ड्रममध्ये असल्याचे सांगितले होते.
पप्पा ड्रममध्ये...चिमुकलीने केला उलगडा
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभची पत्नी मुस्कान आणि प्रियकर साहिल यांनीच त्याची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे 15 तुकडे करून ते एका ड्रममध्ये ठेवले. इतकंच नाही तर पतीच्या हत्येनंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मुस्कानने सौरभच्या मोबाईलवरुन त्याच्या कुटुंबीयांना मेसेज पाठवले. यादरम्यान सौरभच्या बहिणीने त्याला अनेकदा फोन केला, पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिला संशय आला. दरम्यान, सौरभच्या सहा वर्षांच्या मुलीने शेजाऱ्यांना पप्पा ड्रममध्ये असल्याचे सांगितले होते. हे ऐकून संशय बळावला, यानंतर सौरभच्या आईने पोलिसांना माहिती दिली.
ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे
पोलिसांचे म्हणणे आहे की, 4 मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभच्या जेवणात गुंगीचे औषध दिले आणि नंतर साहिलच्या मदतीने सौरभची हत्या केली. आधी चाकूने त्याची हत्या केली, नंतर त्याचा गळा चिरला. मृतदेहाची विल्हेवाट लावणे सोपे व्हावे, म्हणून त्याचे हात कापले आणि प्लास्टिकच्या मोठ्या ड्रममध्ये भरले. इतकेच नाही, तर कुणाला मृतदेह सापडू नये किंवा संशय येऊ नये, यासाठी त्या ड्रममध्ये सिमेंट आणि वाळू टाकून पॅक केला.
कोर्टात हजेरी सुरू असताना आरोपींवर हल्ला
बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संतप्त वकिलांनी दोन्ही आरोपींवर हल्ला केला. यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण मेरठमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. शवविच्छेदनानंतर सौरभ राजपूतचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला, रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.