पत्नीशी बोलत असतानाच क्षेपणास्त्र पडले, सौदीत भारतीय तरुणाचा मृत्यू; २४ तासांनी मित्राने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:44 IST2026-03-21T12:43:21+5:302026-03-21T12:44:12+5:30
सौदी अरेबियातील क्षेपणास्त्र हल्ल्यात उत्तर प्रदेशच्या तरुणाचा मृत्यू झाला.

पत्नीशी बोलत असतानाच क्षेपणास्त्र पडले, सौदीत भारतीय तरुणाचा मृत्यू; २४ तासांनी मित्राने दिली माहिती
UP Man Killed in Iranian Airstrike: मध्य पूर्वेतील युद्धाची भीषण झळ आता भारताच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील बाघैन गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोजगारासाठी सौदी अरेबियाला गेलेला २६ वर्षीय रवी गोपाल, याचा रियाधमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या घटनेला काही दिवस उलटूनही रवीचा मृतदेह अद्याप भारतात न परतल्याने त्याचे कुटुंब हतबल झाले असून प्रशासनाच्या संथ कारभारावर संताप व्यक्त करत आहे.
शेवटचा फोन आणि तो भीषण स्फोट
१८ मार्च रोजी नेहमीप्रमाणे रवी कामावरून परतल्यानंतर रात्री ८:२० च्या सुमारास पत्नी रितूशी फोनवर बोलत होता. दोघांच्या गप्पा सुरू असतानाच, रात्री ९:५३ वाजता अचानक रितूला फोनवर एका प्रचंड स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यानंतर काही क्षणातच फोन कट झाला. रितूने वारंवार प्रयत्न करूनही रवीचा फोन लागला नाही. दुसऱ्या दिवशी रवीच्या मित्राने त्याच्या निधनाची धक्कादायक बातमी दिली.
सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रियाधला लक्ष्य करणारी चार इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडली होती. या क्षेपणास्त्रांचे अवशेष शहराच्या दक्षिणेकडील रिफायनरी जवळ पडले. या पडणाऱ्या अवशेषांच्या तडाख्यात सापडल्याने रवीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला
रवी गोपाल हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. सप्टेंबर २०२० मध्ये रितूशी त्याचे लग्न झाले होते. त्यानंतर तो उदरनिर्वाहासाठी सौदीला गेला होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि एक चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. घराचा आधारस्तंभ गेल्याने हे कुटुंब आता उघड्यावर पडले आहे.
प्रशासकीय मदतीची प्रतीक्षा
रवीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, इतकी मोठी दुर्घटना होऊनही सरकार किंवा संबंधित दूतावासाकडून त्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. "आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. पण आम्हाला फक्त आमचा मुलगा शेवटचा पाहायचा आहे. त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कोणीही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीये," अशी भावना रवीच्या वडिलांनी व्यक्त केली.
मध्य पूर्वेतील युद्ध आणि भारतीयांवरील संकट
सध्या सुरू असलेल्या मध्य पूर्वेतील संघर्षात आतापर्यंत सहा भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे. १४ मार्च रोजी ओमानमधील सोहार येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू झाला. एक आठवड्यापूर्वी सौदीतील अल खार्ज येथे क्षेपणास्त्र निवासी भागात पडल्याने एका भारतीयाचा मृत्यू झाला. तर १८ मार्च रोजी रियाधमध्ये रवी गोपालचा मृत्यू झाला.
खाडी देशांमध्ये लाखो भारतीय बांधकाम, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात काम करत आहेत. युद्धाच्या या वाढत्या भीषणतेमुळे तेथे राहणाऱ्या भारतीय मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
समुद्री क्षेत्रातून १५ कर्मचाऱ्यांची सुटका
एमटी सेफसी विष्णू या जहाजावरील १५ भारतीय क्रू मेंबर्सची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी गुरुवारी इराक सोडून सौदी अरेबियामार्गे आज भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी ओमानमधूनही २४ भारतीय खलाशांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे.