बँक मॅनेजरने सुट्टीस नकार दिला; संतापलेल्या गार्डने थेट छातीत मारली गोळी, मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:26 IST2026-03-16T17:26:16+5:302026-03-16T17:26:48+5:30
UP Crime: मॅनेजरची हत्या केल्यानंतर आरोपी फरार.

बँक मॅनेजरने सुट्टीस नकार दिला; संतापलेल्या गार्डने थेट छातीत मारली गोळी, मृत्यू...
UP Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी बॉर्डर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी धक्कादायक घटना घडली. येथील पंजाब अँड सिंध बँकेच्या शाखेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकानेच बँक मॅनेजरची गोळी झाडून हत्या केली. गोळीबारानंतर आरोपी रक्षक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
बँकेच्या केबिनमध्ये घडली घटना
ही घटना लोनी बॉर्डर परिसरातील बलराम नगर येथील पंजाब अँड सिंध बँकेच्या शाखेत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास सुरक्षा रक्षक रवींद्र हुड्डा बँक मॅनेजर अभिषेक शर्मा यांच्या केबिनमध्ये गेला आणि आपल्या बंदुकीतून थेट मॅनेजरच्या छातीत गोळी झाडली.
गोळीबारानंतर आरोपी फरार
गोळीबाराचा आवाज ऐकताच बँकेत काम करणारे इतर कर्मचारी घाबरून गेले. मात्र काही कळण्याआधीच आरोपी रक्षक रवींद्र हुड्डा घटनास्थळावरून फरार झाला. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या मॅनेजर अभिषेक शर्मा यांना बँकेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने मोटारसायकलवरून रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रजेच्या मुद्द्यावरून सुरू होता वाद
या घटनेबाबत माहिती देताना एसीपी ज्ञान प्रकाश राय यांनी सांगितले की, आरोपी सुरक्षा रक्षक रवींद्र हुड्डा हा बागपत जिल्ह्याचा रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा बँक मॅनेजरसोबत रजेच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. त्याच वादातून संतप्त झालेल्या रक्षकाने ही घटना घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात
गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बँकेतील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.