खळबळजनक! 100 हून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप, VHP च्या तक्रारीनंतर तीन जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 19:32 IST2022-05-22T17:58:33+5:302022-05-22T19:32:34+5:30
आझमगड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरबंशपूर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांना एकत्र करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत होते. त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जात होती.

खळबळजनक! 100 हून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप, VHP च्या तक्रारीनंतर तीन जण ताब्यात
यूपीतील आझमगड येथे महिला आणि पुरुषांचे सामूहिक धर्मांतर केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहिती वरून, पोलिसांनी तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आझमगड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरबंशपूर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांना एकत्र करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत होते. त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जात होती. विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. यानंतर, पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेव्हा, या कार्यक्रमात 100 हून अधिक लोक एकत्रित आले असल्याचे आणि ते धार्मिक पठण करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन मुख्य लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून येत होती तक्रार -
यासंदर्भात बोलताना विश्व हिंदू परिषदेचे आझमगड महामंत्री गौरव रघुवंशी म्हणाले, "धर्मांतरासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तक्रार येत होती, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. भोळ्या लोकांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही. या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच भविष्यात कुणीही असे कृत्य करू नये." याच बरोबर या लोकांविरोधात आझमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू असल्याचेही गौरव रघुवंशी यांनी सांगितले.