आईच्या धैर्याने मृत्यूवर मात; अपघातात श्वास थांबलेल्या मुलाला CPR देत वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:58 IST2026-01-22T11:55:31+5:302026-01-22T11:58:02+5:30
UP Accident: स्वतः जखमी असतानाही आईने पोटच्या पोराला दिले जीवदान...

आईच्या धैर्याने मृत्यूवर मात; अपघातात श्वास थांबलेल्या मुलाला CPR देत वाचवले प्राण
UP Accident: रस्ते अपघातात श्वास थांबलेल्या मुलासाठी त्याची आईच देव बनून आली. गर्दी केवळ पाहत राहिली, पण आईने हार मानली नाही. स्वतः जखमी अवस्थेत असतानाही तिने वेळ न दवडता CPR देत मुलाला मृत्यूच्या दाढेतून परत खेचून आणले. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून ही आईच्या ममतेची आणि धैर्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
बागपत जिल्ह्यातील मांगरोली गावाजवळ अचानक एक ई-रिक्शा नियंत्रण सुटून पलटला. या अपघातात ऋतिक नावाचा युवक सर्वात खाली अडकला. ई-रिक्शाचा जड भाग अंगावर कोसळल्यामुळे त्याचा श्वास घुसमटू लागला आणि काही क्षणांतच तो बेशुद्ध पडला.
लोक पाहत राहिली, आई धावून आली
अपघाताच्या वेळी रस्त्यावर उपस्थित असलेले लोक घाबरून गेले. कोणीही पुढे येऊन मदत करण्याची हिंमत दाखवली नाही. सर्वजण पाहत उभे राहिले. अशा परिस्थितीत अपघातात स्वतःही जखमी झालेली आई मुलापर्यंत पोहोचली. ऋतिक पूर्णपणे निपचित पडला होता. मुलाची अवस्था पाहून ती क्षणभर हादरली.
मात्र, पुढच्याच क्षणी आईने स्वतःला सावरले आणि मुलाच्या छातीवर दाब देत CPR सुरू केले. अनेक प्रयत्नांनंतरही हालचाल दिसत नसतानाही तिने प्रयत्न थांबवले नाहीत. अखेर तिने तोंडाने तोंडाला श्वास देण्यास सुरुवात केली.
पाच मिनिटे… सात मिनिटे… आणि जवळपास दहा मिनिटे आई सातत्याने हे प्रयत्न करत राहिली. अखेर तो क्षण आला, जेव्हा मुलाच्या शरीरात हलकीशी हालचाल जाणवली. श्वास परत येताच आईने ऋतिकला आपल्या कुशीत घेतले. हा प्रसंग पाहून उपस्थित लोकही स्तब्ध झाले.
रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर
काही वेळाने घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली आणि ऋतिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली असून, त्यात आई मुलाला CPR देताना आणि नंतर कुशीत घेताना दिसत आहे.
CPR चे महत्त्व अधोरेखित
ही घटना संकटाच्या क्षणी CPR किती महत्त्वाचे ठरू शकते, हे अधोरेखित करते. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दिलेले CPR एखाद्याचे प्राण वाचवू शकते. आईच्या ममतेने आणि धैर्याने मृत्यूवर मात केली, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.