दोन पासपोर्ट प्रकरणात आझम खानचा मुलगा अब्दुल्ला आझम याला 7 वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:14 IST2025-12-05T15:14:13+5:302025-12-05T15:14:39+5:30
UP News: अब्दुला आझम दोन पॅन कार्ड प्रकरणात आधीपासून तुरुंगात आहे.

दोन पासपोर्ट प्रकरणात आझम खानचा मुलगा अब्दुल्ला आझम याला 7 वर्षांची शिक्षा
UP News: उत्तर प्रदेशातील रामपूर न्यायालयाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याला दोन पासपोर्ट प्रकरणात दोषी ठरवले असून, 7 वर्षांचा तुरुंगवास आणि ₹50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. भाजप आमदार आकाश सक्सेना यांच्या तक्रारीनंतर अब्दुल्ला आझम आणि इतरांविरुद्ध 2019 साली कलम 420 (फसवणूक), 467, 468 (बनावट ओळखपत्र) आणि 471 अंतर्गत खटला दाखल झाला होता.
बनावट कागदपत्रे समाजासाठी धोका
आपल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले की, बनावट कागदपत्रे समाज व राष्ट्रासाठी धोकादायक ठरू शकतात. अशा कागदपत्रांचा वापर गुन्हे, दंगे किंवा ओळख बदलण्यासाठी केला जाऊ शकतो. आजच्या सुनावणीला अब्दुल्ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाला.
काय आहे प्रकरण ?
2019 मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार आकाश सक्सेना यांनी अब्दुल्ला आजम आणि इतरांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी संबंधित आरोपींवर दोन पासपोर्ट आणि दोन पॅन कार्ड बाळगल्याचा आरोप केला हता. अशा खोट्या ओळखीचा वापर बँकिंग, मतदान किंवा अन्य संवेदनशील कामांसाठी केला जाऊ शकत होता, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता.
दरम्यान, अब्दुल्ला आजम आधीच पॅन कार्ड प्रकरणात रामपूरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. आता नवीन निर्णयामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याचे वडील आजम खान, हेदेखील सध्या जेलमध्ये आहेत.